मुख्य सामग्रीवर वगळा

दोन ओंडक्यांची होते... (उत्तरार्ध)

पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. माझेही बहुतांशी अनुभव तसेच आहेत. आता युनिफॉर्म घातल्यामुळे टर्रेबाजी करायला हुरूप येतो का विशिष्ट काम करताना येणाऱ्या अनुभवांमुळे तसं वागलं जातं हा वेगळा विषय आहे. बट फॅक्ट रिमेन्स. मात्र अपवादात्मक का होईना, युनिफॉर्म मधल्या काही चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. आठवणींच्या वादळात कितीतरी ओंडके आज एका लाटेनं जवळ येताहेत व दुसऱ्या लाटेनं लांब जाताहेत.

लहानपणापासून ज्याची आपल्याला भीती घातली जाते तो पहिला युनिफॉर्म म्हणजे पोलीस. गप जेव नाहीतर पोलिसाला बोलवीन, या व अशा अनेक धमक्या आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे कुठेही पोलीस दिसला की पोटात बाकबुक होतंच. त्यात चित्रपटांमधे पाहिलेले पोलीस यात आणखी भरच घालतात. नंतरच्या काळात काही पोलीस मित्रही झाले, तसेच काही वर्गमित्र पोलीस झाले. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूही कळली. पण जो पोलीस माझ्या लक्षात आहे तो खूप वेगळा आहे.

ह्या पोलिसाला मी पाहिलं त्याकाळी हवालदार मंडळी हाफ पॅन्ट व पठाणी सॅंडल घालून, पोटऱ्यांना खाकी रंगाच्या पट्ट्या गुंडाळत असत. सुट्टीत एकदा मावशीकडे मुंबईला गेलो होतो. संध्याकाळी आम्ही सगळे चौपाटीवर फिरायला चाललो असताना एका चौकात एक ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे चौकाच्या मध्यभागी एक लोखंडी चौथऱ्यावर उभं राहून हे काम चालू होतं. पण थांबा, जा यासाठी करायचे हातवारे शास्त्रीय नृत्याच्या अंगानं चालले होते. येणारे जाणारे थांबून ते नृत्यमय वाहतूक नियंत्रण बघत होते. आम्हीही अवाक होऊन तो कार्यक्रम बघत होतो. तितक्यात त्या पोलिसाचं आमच्याकडे लक्ष गेलं व आमच्याकडे बघून तो दिलखुलास हसला. त्याचं ते नृत्यमय वाहतूक नियंत्रण व दिलखुलास हसरा चेहरा कायम लक्षात राहिला आहे.

पोलिसांचा दुसरा एक असाच सुखद अनुभव मला आला तो इंग्लंडमधल्या रेडींग नावाच्या गावात. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. पहिल्यांदा अशी वेळ होती की माझा वाढदिवस आणि मी एकटा होतो. तसं सकाळीच बायकोशी, आईवडिलांशी फोन झाला होता. पण नंतर दिवसभर, कामाच्या ठिकाणी वगैरे कुणाला पत्ता नव्हता. संध्याकाळी मी एकटाच थोड्या लांबच्या एका जरा जास्त बऱ्या हॉटेलमधे जेवायला गेलो. परत येताना गस्तीवरच्या दोन लेडी पोलिसांनी मला थांबवलं. तसा फार उशीर झाला नव्हता. आठ साडेआठच झाले होते, पण त्या गावात पूर्ण शुकशुकाट होता. मी पासपोर्ट काढून दिला. तो पहाताना त्यातल्या एकीनं कुठे गेला होतास, कुठे चाललायंस वगैरे चौकशी केली व ओके म्हणत पासपोर्ट परत दिला. थँक्स म्हणत मी निघणार तेव्हढयात एक मिनिट असं म्हणत खिशातून एक चॉकलेट काढून मला दिलं. आज तुझा वाढदिवस आहे ना? मी पासपोर्टवर तारीख पाहीलीय. एन्जॉय, असं म्हणत दोघी पुढे निघून गेल्या. आजही त्या दोघी नीट लक्षात आहेत माझ्या.

व्यवसायाला सुरुवात केल्यानंतरच्या काळात मला बरेच वेळा ठाण्याला जावं लागे. पुण्याच्या स्वारगेटवरून सकाळी सहाला सुटणारी बस मी पकडायचो. बरेच वेळा जाऊन ड्रायव्हर कंडक्टर माहितीचे झाले होते. एका खेपेला मात्र एक वेगळेच ड्रायव्हर महाशय त्या गाडीवर आले. गाडी फलाटाला लावली व खाली उतरून गाडीच्या पुढल्या टायरवर पाणी ओतलं. खिशातून चार फुलं काढून चाकावर ठेवली. उदबत्ती लावून ओवाळलंही. पहिल्यांदाच पहात होतो हे मी. पुढे लोणावळ्याला थांबल्यानंतर मी त्यांना गाठलं व हा काय प्रकार आहे विचारलं. 'गाडी म्हणजे माझी लक्षुमी आहे. म्हणून रोज दिवस सुरु करताना तिची पूजा करतो.' ह्या उत्तराची मला अपेक्षा नव्हती. ठाण्याला पोचल्यानंतर सर्व प्रवाशांना एसटीने प्रवास केल्याबद्दल धन्यवाद देणाऱ्या त्या ड्रायव्हर महाशयांना विसरणं केवळ अशक्य आहे.

हल्ली आपण बरेच जण सर्रास विमानानं प्रवास करतो. बरेचजण या ना त्या निमित्तानं परदेशीही जाऊन आले असतील, अनेकवेळा जा ये करत असतील. असं असूनसुद्धा वैमानिक (पक्षी: कॅप्टन) ह्या इसमाभोवतीचं एक गूढ वलय आपल्या मनात असतं. म्हणजे आपण त्या गेटपाशी आत सोडायची वाट पहात असतो. तेव्हढ्यात आधी त्या पाच सात सुंदऱ्या येतात. मागून अतिशय रुबाबदार चालीनं दोघं वैमानिक येतात. पांढराशुभ्र शर्ट, काळी किंवा निळी पॅन्ट, डोक्यावर पी कॅप, छातीवर, खांद्यावर सोनेरी चिन्ह असे ते दोघं, त्यांची ठराविक पद्धतीची बॅग ओढत येतात. आजूबाजूच्या प्रवाशांकडे एक साधा कटाक्षही न टाकता, गळ्यातलं ओळखपत्र दाखवून जे आत अदृश्य होतात, ते परत दिसतही नाहीत. जगभरातल्या सर्व वैमानिकांची हीच तऱ्हा असते.

अमेरिकेतल्या एका वैमानिकानं मात्र या सगळ्याला छेद दिला. झालं असं की मी अटलांटाहून शिकागोला चाललो होतो. सर्व प्रवासी विमानात बसले, विमान थोडंसं हललंही. पण एक कुठला तरी दिवा बंद होईना म्हणून पुन्हा थांबलं. मेकॅनिकला बोलावणं पाठवलं. तो येता येईना. कॅप्टन आता बाहेर आला. प्रवासीही अस्वस्थ झाले होते. तेव्हढ्यात कॅप्टनने सूत्र हातात घेतली. विमानातल्या दोन सुंदऱ्यांपैकी एक अगदी तरुण, नुकतीच नोकरीला लागली होती. कॅप्टननं पहिल्यांदा तिची खेचली. त्यानं अनाऊन्स केलं की ही मुलगी इंजिनीअर आहे, तिला खरं तर ही दुरुस्ती करता येते. पण या कामासाठी एक्सट्रा पैसे मिळणार नसल्यामुळे ती हे काम करायला तयार नाहीये. सगळ्या प्रवाशांनी प्लीज प्लीज असं म्हणत तिला अगदी लाजवून टाकलं. तेवढ्यात मेकॅनिक आला. तरी वेळ लागत होता. आता कॅप्टन त्याच्यावर घसरला. 'काय आहे ना, तुम्हाला सांगतो, हा लेकाचा मुद्दाम वेळ लावतोय. हे काम जर लगेच केलं ना तर त्याला दुसरीकडे पाठवतील. म्हणून इथेच टाईमपास करतोय'. पुन्हा सगळ्या प्रवाशांनी प्लीज प्लीज म्हणत त्याला पिडलं. पुढल्या पाच मिनिटात काम झालं. त्यावर कहर म्हणजे, चला आता आपण उडणार असं म्हणत त्या कॅप्टननं दुसऱ्या सिनिअर सुंदरीचा हात धरून चक्क एक छोटा डान्स केला व सर्वांना बाय करून आपल्या कामाला लागला. जवळजवळ अर्धा तास त्यानं प्रवाशांना गुंतवून ठेवलं व त्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊ दिला नाही. त्या गोऱ्यापान, निळ्या डोळ्याच्या, साधारण शरद तळवलकरांसारख्या दिसणाऱ्या कॅप्टनला विसरणं अशक्य आहे.

जसे काही सामान्य चेहरे लक्षात राहिले तसेच हे गणवेषातील, तसे सामान्यच, चेहरेही लक्षात राहिले. पुन्हा तोच प्रश्न. किती लिहू आणि कोणाकोणाबद्दल लिहू. सहकारी सुंदरीनं अनाउन्समेंट सुरु केली की बरोब्बर त्या शब्दांवर डबिंग केल्यासारखे ओठ हलवणारा केनया एयरवेजचा एक पर्सर, मी बहुधा स्मगलर किंवा गुप्तहेर किंवा अतिरेकी असल्याच्या संशयानं माझी सर्व कागदपत्र तपासणारा चीनमधला, कुमार शानू सारखा दिसणारा, एक इमिग्रेशन ऑफिसर, बेल्जीयममधल्या लोमेल नावाच्या एका बुद्रुक स्टेशनवरचा म्हातारा स्टेशनमास्तर, किती नि किती...

कितीतरी हे चेहरे. आता कुठे असतील, काय करत असतील, मुळात अजून आहेत का गेले? कशाचाच काही पत्ता नाही. त्यावेळी नावगाव विचारलं नाही, यापुढे कळणं शक्य नाही.  शेवटी महाकवी गदिमांनी लिहिलंय ना तेच त्रिवार सत्य आहे...

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ... 

पुढे खरं तर त्यांनी असं म्हणलंय की, 'क्षणिक ते ही आहे बाळा, मेळ माणसांचा'. पण हे अर्धसत्य नाही का? आज जरी मी त्या माणसांना पुन्हा भेटणार नसलो तरी ते दुरावलेत थोडेच?

ते तर कायमच माझ्याबरोबर राहतील... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून