मुख्य सामग्रीवर वगळा

तीन अ. ल. क. (अति लघु कथा)

अलक १.

रोज संध्याकाळी घरी आल्याआल्या त्याला काहीतरी सटरफटर खायला लागतं. एरवी ती काहीतरी तयार ठेवतेच. पण आज तिचा उपास असल्यामुळे जाम कंटाळा आला होता. 'तूच येताना काहीतरी आण' असं सांगायला दोनदा फोन केला, पण 'व्यस्त' लागला. काहीतरी करायलाच पाहिजे याविचाराने ती किचनकडे वळली. तेव्हढयात बेल वाजली. तिनं दार उघडलं. आत येऊन त्यानं एक पुडकं तिच्या हातात ठेवलं व म्हणाला, आज तुझा उपास आहे ना म्हणून साबुदाणा वडे आणलेत....

डोळ्यात दाटलेल्या धुक्यात ते पुडकं कधीच दिसेनासं झालं होतं....

अलक २.

रिपरिप पावसातच ती घराजवळच्या मंडईत गेली होती. भाजी तर मनासारखी मिळाली, पण तसल्या त्या चिकचिकटात जड पिशव्या उचलायचं आता जिवावर आलं होतं. तेव्हढ्यात मागून एका कोवळ्या पण दणकट हातानं त्या पिशव्या उचलल्या. "क्लासमधून आलो तर बाबा म्हणले तू मंडईत गेली आहेस, म्हणून आलो पटकन... ", तो म्हणाला...

तिच्याच काळजाचा तो तुकडा आता तिच्या डोळ्यात मावत नव्हता....

अलक ३.

शाळेत असल्यापासून मी खूप आळशी आहे. विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नांना दीर्घ उत्तर अथवा पंधरा मार्कांसाठी निबंध वगैरे लिहायचं जाम जिवावर येत असे. थोडक्यात काहीतरी लिहून टाकायचो व नंतर बोलणी आणि / किंवा मार खायचो. ह्याच कारणामुळे अलक लिहायला सहज जमेल असं वाटलं होतं. एका झटक्यात तीन तरी अलक लिहून टाकायचा विचार होता. पण लिहायला बसल्यावर ते तितकंसं सोपं नाहीये असं लक्षात आलं. कशाबशा दोन लिहील्या. तिसरी काही केल्या जमेना.

सरळ 'जमत नाहीये' असं तुम्हाला सांगून टाकावं म्हणून तसं लिहायला घेतलं, तर मधल्यामधे माझ्या अलक लिखाणाचीच एक अलक झाली...  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...