मुख्य सामग्रीवर वगळा

वेव्हलेंग्थ

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एखादा माणूस असा भेटतो की ज्याला आपण आधी कधी पाहिलेलंही नसतं. पण काही वेळातच वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत धागे जुळतात. सोप्या मराठीत सांगायचं तर 'वेव्हलेंग्थ' जुळते. त्या दोघांची वेव्हलेंग्थ अशीच जुळली.

दोघांपैकी जो मोठा होता त्याला तीन मुली होत्या. त्यापैकी थोरल्या दोघींची लग्न होऊन त्यांना पोरंही झाली होती. तिसरं शेंडेफळ जरा लाडोबा होतं. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. बापानं आजवर जवळजवळ पंचवीस स्थळं आणली होती. पण हिला एक काही पसंत पडत नव्हतं. कोणी चम्याच आहे, तर कोणी राक्षस आहे. कोणाची आईच माकडीणीसारखी दिसतेय, तर कोणाचा बापच जाडभिंग्या आहे, असली कारणं सांगून नकारघंटा ठाणठाण वाजत होती. पण आपल्या ह्या अप्सरेगत शेंडेफळासाठी तो चपला झिजवत होता. अचानक एकेदिवशी शेंडेफळानंच त्याचा प्रॉब्लेम सोडवला. ऑफिसमधून येताना एकाला घेऊन आली व ह्याच्याशी मी लग्न करतेय म्हणून ओळख करून दिली. एकूण बरा वाटलं तो त्याला. पण शेवटी बापाचं काळीज होतं ते, काळजी तर वाटलीच.

काळजी वाटणंही स्वाभाविक होतं. खूप कष्टातून तो पुढं आला होता. पाच बहिणींचा एकटा भाऊ होता तो. परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आलं नव्हतं. पण अंगभूत गुणांच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवली. जिद्दीने स्वतःचा बंगला बांधला. त्यासाठी नवराबायकोनी अमाप कष्टही केले होते. हमालीचा एक रुपया वाचवायला सायकलवरून सिमेंटची पोती आणली होती. खूप मेहेनतीनं बंगल्याभोवती बाग फुलवली होती. छंद पण व घरच्या भाज्यांमुळे पैशाची बचत पण. ह्या सर्व कष्टांचं फळ दोन चांगल्या जावयांच्या रूपानं मिळालं होतं. प्रश्न आता तिसऱ्याचाच होता.

साखरपुडा तर झाला पण काही कारणानं लग्न थोडं उशिरा होतं. मधल्या काळात हा तिसरा जवळजवळ रोज घरी येत असे. आणि ह्याच काळात दोघांची वेव्हलेंग्थ जुळली. मोठा तसा बोलका नव्हता, पण छोटा पक्का बोलघेवडा. हळूहळू छोट्यानं मोठ्याला बोलतं केलं. कुठल्या कुठल्या गप्पा मारायचे दोघं. मोठ्याला खायला बनवायला आवडायचं आणि छोटा पक्का खवय्या. मग मोठा कधी शिरा बनवायचा. पिठलं तर जाम भारी बनवायचा. दोघांनाही कार मधून भटकायला आवडायचं. त्यातही दोघांचा आवडीचा छंद म्हणजे गाडीला आडवं आलेल्याला वेचक शिव्या घालणे. छोट्याच्या शिव्यांच्या संपत्तीवर मोठा जाम खूष असायचा. मोठाही काही कमी नव्हता. लोकांना चपखल नावं ठेवण्यात त्याचा हात कुणीही धरला नसता. कुणाला माठ्या म्हण, त्याच्या बायकोला अंबा म्हण, दुसऱ्या एका जोडप्याला दादा कोंडके, उषा चव्हाण म्हण, असले धंदे चालायचे. त्याची बायको कधी कधी त्याच्यावर चिडायची तर लाल लाल होईस्तवर हसायचा. खरं सांगायचं तर ह्या असल्या गोष्टी करायला तल्लख विनोदबुद्धी लागते जी त्याच्याकडे भरपूर होती. दोघांची अजून एक कॉमन आवड म्हणजे बॉक्सिंग. टीव्हीवर बॉक्सिंगची मॅच असली की हाण, मार असे दोघांचे आरडेओरडे चालायचे.

तिसरीच्या लग्नानंतर मात्र तो खूप उदास झाला. हार्टचाही त्रास सुरु झाला. तिच्या मुलावर त्याचा फार जीव होता. 'माझा कृष्ण आहे' म्हणायचा. थोरल्या चिडायच्या. हिचा तेव्हढा कृष्ण, आमचा तो पेंद्या. यावर तो फक्त हसायचा. पुढे हळूहळू तब्येत खालावली व अखेर एक दिवस तो गेला.

छोट्यानं त्याचा एक मस्त मित्र गमावला होता.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस