मुख्य सामग्रीवर वगळा

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय... 

मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. 

पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कुलात जायचे. काही झालं तरी हायस्कुल ते हायस्कुलच ना. त्यामुळे पाचवीत गेल्यावर मला खूप मोठ्ठा झाल्यासारखं वाटलं. पण तो चार्म फार टिकला नाही. मी ज्या शाळेत होतो ना ती शाळा गावातल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील पथकासाठी प्रसिद्ध होती. पण आठवीत गेल्याशिवाय त्या पथकात घेत नसत. त्यामुळे कधी एकदा आठवीत जातोय असं झालं होतं. एकदाचा मी आठवीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

आठवीत गेल्यावर दहावी. दहावीत जायचं थ्रिल तर फारच होतं. आमच्यावेळी दहावीत गेल्यावर घड्याळ व फुलपॅण्ट मिळायची. त्यामुळे दहावीत ह्या गोष्टी मिळाल्यावर तर फारच मोठं झाल्यासारखं वाटलं. दहावीत गेल्यावर अकरावी, मोठं कॉलेज अशी पुढली पुढली आकर्षणं येत गेली व प्रत्येक टप्प्यावर मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

ग्रॅज्युएशननंतर सीए झालो, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचं ऑफिस घेतलं. कामाला चार पाच मुलं, टेबलावर फोन, मागे पुढे झुलणारी चाकाची खुर्ची, दोन पाच कॉम्प्युटर्स. काही दिवसांनी चारचाकी घेतली. पुढे लग्न झालं, मुलगा झाला. व्यवसायही वाढत राहिला. मोठी गाडी, मोठं वातानुकुलीत ऑफिस, लॅपटॉप्स, खूप कर्मचारी, परदेश दौरे, आणखी काही दिवसांनी स्वतःचं मोठं, स्वतंत्र घर. प्रत्येक टप्प्यावर मी मोठा होत राहिलो. 

पण एक जागा अशी होती की जिथे माझं लहानपण संपलं नव्हतं. मोठं होण्याच्या प्रत्येक लहान मोठ्या टप्प्याचं तिथे व्यक्त, अव्यक्त कौतुक होत राहिलं. कधी दुरून, कधी जवळून. ती जागा सर्वार्थानं माझ्यापेक्षा मोठी होती, कायमच राहणार होती. कारण ती 'बाप' जागा होती. त्या जागी मी कायमच छोटुस्सा राहणार होतो. खरं तर 'कायमच राहणार' असं मला वाटायचं. तो माझा गैरसमज होता.

बरोब्बर एक वर्षापूर्वी बाबा गेले... 

मला कायमचं मोठ्ठ करून... 

पुन्हा कधीच लहान होऊ न देण्याकरता.... 





© मिलिंद लिमये

टिप्पण्या

 1. Kya baat hai
  Baap aakhir baap hota hai

  Nevertheless we can continue to live like kids because....

  Saglyaancha toh baap sadaiva sarvatra asnaarach aahe

  उत्तर द्याहटवा
 2. एक वर्ष उलटले सुद्धा. त्यावेळी लिहिलेला लेख सुद्धा मनाला चटका लावुन गेला होता. दिवसागणिक तू मोठा होत गेलास पण आता लहान होणे मागे राहिले. हा चटका कायमचा 😔😔

  उत्तर द्याहटवा
 3. फार छान लिहिलं आहेस मिलिंद. मनाचा ठाव घेणारं!

  उत्तर द्याहटवा
 4. फारच सुरेख. अतिशय वेधक चित्रंण. खरं तर अजून एक जागा आहे. परमेश्वर. ज्याच्या देवळात जायचं असेल तर वाकुनच जावे लागते. तूम्ही कितिही मोठे व्हा. त्याच्या पुढे लहानच.

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क