मुख्य सामग्रीवर वगळा

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय... 

मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. 

पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कुलात जायचे. काही झालं तरी हायस्कुल ते हायस्कुलच ना. त्यामुळे पाचवीत गेल्यावर मला खूप मोठ्ठा झाल्यासारखं वाटलं. पण तो चार्म फार टिकला नाही. मी ज्या शाळेत होतो ना ती शाळा गावातल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील पथकासाठी प्रसिद्ध होती. पण आठवीत गेल्याशिवाय त्या पथकात घेत नसत. त्यामुळे कधी एकदा आठवीत जातोय असं झालं होतं. एकदाचा मी आठवीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

आठवीत गेल्यावर दहावी. दहावीत जायचं थ्रिल तर फारच होतं. आमच्यावेळी दहावीत गेल्यावर घड्याळ व फुलपॅण्ट मिळायची. त्यामुळे दहावीत ह्या गोष्टी मिळाल्यावर तर फारच मोठं झाल्यासारखं वाटलं. दहावीत गेल्यावर अकरावी, मोठं कॉलेज अशी पुढली पुढली आकर्षणं येत गेली व प्रत्येक टप्प्यावर मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.

ग्रॅज्युएशननंतर सीए झालो, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचं ऑफिस घेतलं. कामाला चार पाच मुलं, टेबलावर फोन, मागे पुढे झुलणारी चाकाची खुर्ची, दोन पाच कॉम्प्युटर्स. काही दिवसांनी चारचाकी घेतली. पुढे लग्न झालं, मुलगा झाला. व्यवसायही वाढत राहिला. मोठी गाडी, मोठं वातानुकुलीत ऑफिस, लॅपटॉप्स, खूप कर्मचारी, परदेश दौरे, आणखी काही दिवसांनी स्वतःचं मोठं, स्वतंत्र घर. प्रत्येक टप्प्यावर मी मोठा होत राहिलो. 

पण एक जागा अशी होती की जिथे माझं लहानपण संपलं नव्हतं. मोठं होण्याच्या प्रत्येक लहान मोठ्या टप्प्याचं तिथे व्यक्त, अव्यक्त कौतुक होत राहिलं. कधी दुरून, कधी जवळून. ती जागा सर्वार्थानं माझ्यापेक्षा मोठी होती, कायमच राहणार होती. कारण ती 'बाप' जागा होती. त्या जागी मी कायमच छोटुस्सा राहणार होतो. खरं तर 'कायमच राहणार' असं मला वाटायचं. तो माझा गैरसमज होता.

बरोब्बर एक वर्षापूर्वी बाबा गेले... 

मला कायमचं मोठ्ठ करून... 

पुन्हा कधीच लहान होऊ न देण्याकरता.... 





© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. Kya baat hai
    Baap aakhir baap hota hai

    Nevertheless we can continue to live like kids because....

    Saglyaancha toh baap sadaiva sarvatra asnaarach aahe

    उत्तर द्याहटवा
  2. एक वर्ष उलटले सुद्धा. त्यावेळी लिहिलेला लेख सुद्धा मनाला चटका लावुन गेला होता. दिवसागणिक तू मोठा होत गेलास पण आता लहान होणे मागे राहिले. हा चटका कायमचा 😔😔

    उत्तर द्याहटवा
  3. फार छान लिहिलं आहेस मिलिंद. मनाचा ठाव घेणारं!

    उत्तर द्याहटवा
  4. फारच सुरेख. अतिशय वेधक चित्रंण. खरं तर अजून एक जागा आहे. परमेश्वर. ज्याच्या देवळात जायचं असेल तर वाकुनच जावे लागते. तूम्ही कितिही मोठे व्हा. त्याच्या पुढे लहानच.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...

मागचं सीट

मागल्या आठवड्यात काही कामानिमित्त शहराजवळच्या ग्रामीण भागात जाणं झालं. पावसाळा सरत आला होता तरी अधूनमधून  रिमझिम चालू होती. आधी झालेल्या पावसामुळे निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली होती. हिरव्या रंगाच्या अनेक छटा, मधूनच वाहणारे झरे, लांब डोंगरात दिसणारे छोटे छोटे धबधबे, शेतात चरणारी गुरं मनाला सुखावून जात होते. मी गाडीत मागच्या सीटवर बसून ह्या सगळ्याचा आनंद घेत होतो. काही अंतर गेल्यावर मला एक तरुण मुलगा एका म्हाताऱ्याला, बहुधा त्याचा आजा असावा, सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसवून सायकल हाणत चालला होता. रस्ता तसा अरुंद होता. त्यामुळे चालकाने सावकाश त्यांच्या शेजारून गाडी पुढे काढली. त्यांच्या शेजारून जाताना माझी म्हाताऱ्याशी नजरभेट झाली. त्यानं हसून मला रामराम केला. मीही त्याला प्रतिनमस्कार केला. आम्ही पुढे निघालो. हे मागचं सीट फार लहानपणापासून माझ्या आठवणीत आहे. माझ्या लहानपणी सर्व मंडळी सर्रास सायकली वापरायची. त्यामुळे कळायला लागल्यापासून आईच्या लेडीज सायकलच्या मागल्या कॅरियरवर बसून मी तिच्याबरोबर जात असे. बाबांनी मात्र पुढल्या दांड्यावर एक छोटं सीट खास माझ्यासाठी बसवून घेतलं होतं. ...