मुख्य सामग्रीवर वगळा

कॅमेरा

सध्याच्या ह्या करोना विषाणूच्या कुलूपबंद परिस्थितीत रोज सकाळी उठल्यानंतर 'आता काय' हा प्रश्न आ वासून उभा असतो. ऑफिसचं थोडंफार काम असतं, नाही असं नाही. पण ते झाल्यानंतर काय हा प्रश्न राहतोच. टीव्ही पाहा, झाला पाहून. गाणी ऐक, झाली ऐकून. व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू का? केला थोडा वेळ. पुढे काय? अशा पद्धतीचा नाईलाज झाला की माझ्याकडे एक हमखास उपाय आहे. तो म्हणजे कुठलं तरी कपाट, माळा असं काहीतरी आवरायला काढायचं. हा खरा माझ्या आजीचा उपाय. लहानपणी आजोळी गेल्यावर दुपारच्यावेळी आम्हा पोरांना बिझी ठेवण्यासाठी ती माळा आवरायला काढायची. एकेक वस्तू व त्याच्या आठवणी यात सगळी दुपार सरायची. आजीचा हा रामबाण उपाय मी आजही वापरतो.

आजही मी माळा आवरायला काढला. उलथापालथ करताना एक बॉक्स पुढे आला. काय आहे बघायला उघडला तर दोन कॅमेरे, एक फ्लॅशगन, एक रिकामं रीळ, रोलच्या दोन चार रिकाम्या डब्या असा सगळा ऐवज त्यात दिसला.

त्यापैकी एक कॅमेरा क्लीक III प्रकारचा होता. कोणे एके काळी ह्या कॅमेऱ्याची फार शान होती. कृष्णधवल फोटोंचा काळ होता तो. काही थोड्या बेसिक सोयी व फोटो काढणाऱ्याचं स्किल (व नशीब) यातून जे फोटो येतील ते येतील, असा प्रकार असायचा. शिवाय त्यात तो रोल भरा, तो नीट पुढे ढकला, संपल्यावर एक्सपोज होऊ न देता बाहेर काढा, ही व असली अनेक शुक्लकाष्ठ असायची. मग अनेक वेळा तो रोल नीट पुढे न गेल्यामुळे एकावर एक फोटो येणे, पूर्ण रोलच फॉग निघणे, असले अपघातही होत. एकूणच तो कुणाही सोम्यागोम्याला झेपणारा प्रकार नव्हता.

 दुसरा कॅमेरा हॉट शॉट नावाचा होता. ह्याही कॅमेऱ्यानं एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'जस्ट एम अँड शूट' अशी त्याची जाहिरात होती. एक कॅसेटसारखा रोल भरा, दोन वेळा पुढे ढकला आणि क्लीक. फारच सोपा प्रकार होता. त्यात पुन्हा ह्या कॅमेऱ्याने रंगीत फोटो काढता येत होते. कॉलेजला असताना मे महिन्याच्या सुट्टीत मी एका सीएच्या ऑफिसमधे कामाला जात होतो. दोन अडीच महिने काम केल्याचे जे पैसे मिळाले होते, त्यातून मी हा कॅमेरा घेतला होता.

ह्या दोन्ही कॅमेऱ्यांचा आणिक एक ताप होता, तो म्हणजे ह्यात जो फिल्मचा रोल घालावा लागे, त्यात चोवीस किंवा छत्तीस फोटो निघत. बरं एकदा फोटो निघाला की निघाला. मग तो रोल डेव्हलप करायला देणे, त्याचे प्रिंट्स काढणे हा पुढला प्रकारही फार खर्चिक होता. ते प्रिंट हातात आल्यावर कळायचं की एका फोटोत कुणीतरी जांभई देतंय, कुणाचे डोळे गौतम बुद्धासारखे अर्धोन्मीलित आलेत, काय नि काय. आणि हे कळेपर्यंत वेळ व पैसा, दोन्ही निघून गेलेली असायची.

डिजिटल युगानं ह्या सर्व मंडळींना माळ्याची वाट दाखवली. पूर्वी कशाचा फोटो, कधी, कसा काढायचा हे ठरवून मग फोटो काढला जायचा. आता काय कितीही फोटो काढा, कसेही काढा. चोवीस, छत्तीसचं बंधन नाही. काढलेला फोटो लगेच स्क्रीनवर बघा. काही चुकलं तर डिलीट करा. शिवाय मग काढलेल्या फोटोवर वेगवेगळे फिल्टर वापरून त्यात विविधता आणा. साध्या नजरेला न दिसणारा नजारा त्यातून मग साकार होतो. 

तसं पाहिलं तर आपणही एक कॅमेराच आहोत की. डोळे म्हणजे लेन्स. मेंदू म्हणजे प्रोसेसर. दोन्हीच्या साहाय्याने आपण आपल्या मनात वेगवेगळ्या प्रतिमा उमटवत असतो. पण मग त्या निर्जीव कॅमेऱ्यातून घेतलेले फोटो नीट निघावेत, छान दिसावेत म्हणून मेहनत घेणारे आपण, मनाच्या सजीव कॅमेऱ्याने घेतलेल्या फोटोंबाबत इतके निष्काळजी का बरं असतो? का आपल्या मनातल्या काही प्रतिमा डागाळलेल्या असतात? का काही प्रतिमा प्रत्यक्षापेक्षा वेगळ्याच उमटतात? कशामुळे काही फोटो भडक दिसतात? का आपण एखाद्या फोटोतले रंग स्वतःच विस्कटून टाकतो? आलाच एखादा फोटो चुकीचा, तरी आपण तो डिलीट न करता उलट नीट जपून का ठेवतो? विचारांचा रोल कितीतरी वेळ सर्रर्रर्र सर्रर्रर्र पुढे सरकत होता... 

दोन्ही कॅमेरे आजही सुस्थितीत होते. कितीतरी वेळ मी त्यांच्याशी उलटसुलट करत खेळत बसलो होतो. गेली कित्येक वर्षं मला हव्या असलेल्या प्रतिमा उमटवणारे हे दोन कॅमेरे, आज स्वतःच एक वेगळी प्रतिमा उमटवून गेले होते. 


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

 1. Kya baat hai Milind

  A true trip down memory lane. However a fantastic analogy of cameras with our minds is really thought provoking

  You have touched upon multiple interesting areas in a concise way. Truly a Blender's Pride

  Cheers

  उत्तर द्याहटवा
 2. छान ब्लॉग ! या ब्लॉग रुपी कॅमेऱ्याने एक सुंदर फोटो काढला आहेस 👍🏼👍🏼

  उत्तर द्याहटवा
 3. अति उत्तम
  लहान लहान रोजच्या जीवनातील गोष्टीमधून अर्थपूर्ण सारांश काढायची तुझी हतोटी फारच सुंदर आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. Wah. Aflatoon. Tya velchya camera ani role chya gamti jamti ajun athavtat. Purna 36 role sampla ki developer kade dilya nantar shock basne ki ek hi photo ala nahi vagaire..

  उत्तर द्याहटवा
 5. Well written Milind. Cameras kitihi advanced zale tarihi photos click karaychi ani restore karaychi maja veglich ahe.

  उत्तर द्याहटवा
 6. Fantastic milind and thanks for taking us down the memory lane..great drawing parallels between camera and mind..

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून