मुख्य सामग्रीवर वगळा

कोविडेच्छा बलियसी

परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा

परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई

बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं

लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी

मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं

ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल

मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा

ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू

ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा

चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा  करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी परीक्षा झाली की...' ह्या सदरात टाकले होते. शिवाय 'नेमेचि येतो मग तो उन्हाळा' ह्या प्रकारचेही कार्यक्रम ठरले होते.

आज जवळजवळ दीड महिना झाला...

परीक्षा संपून, सुट्ट्या लागून, उन्हाळा सुरू होऊन...

अजून लायसन्स काढायला झालंच नाहीये...

नाईट आउट कसलं करायला मिळतंय...

गोव्याला जायची तारीखच ठरत नाहीये...

मार्केट यार्ड सोडा, आंबेच खायला मिळतील की नाही कोण जाणे...

असो....

शेवटी काय? कोविडेच्छा बलियसी....


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...