मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - ट्रेलर

वस्तुतः मी चित्रपटप्रेमी नाही. फावल्या वेळात चित्रपट बघण्यापेक्षा काहीतरी वाचायला मला जास्त आवडतं. म्हणजे असं नाही की मी पिक्चर्स पहातच नाही. कॉलेजला असताना लेक्चर बुडवून थोड्याफार मॅटिनी 'टाकल्या' आहेत. पण थोड्याच. फार नाहीत. मी आयुष्यातले सगळ्यात जास्त पिक्चर्स पाहीले असतील ते माझ्या सीएच्या आर्टिकलशिपच्या तीन वर्षांच्या काळात. 

मी ज्या फर्ममधे काम करत होतो तिथे बरेचवेळा, बरेच दिवस, बाहेरगावी कामासाठी जावे लागायचे. त्याकाळी आजच्यासारखे सत्राशेसाठ चॅनेल्स, ओटीटी, वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ज्या गावी जायचो तिथे असलेल्या टॉकीजमधे असेल तो पिक्चर बघणे, एव्हढा एकच मनोरंजनाचा मार्ग उपलब्ध असायचा. मग त्यापायी आम्ही अनेक अत्रंगी उद्योगही केले. एका गावात मोजून सात टॉकीज होत्या. आम्ही प्रत्येक टॉकीजला एक वार बहाल केला. त्या वारी त्या टॉकीजला जो कुठला पिक्चर असेल तो बघायचा असा नियम. अनेकवेळा मागच्याच आठवड्यातला पिक्चर बदललेला नसायचा. तरीही तोच पिक्चर बघायचा. नियम म्हणजे नियम. दुसऱ्या एका गावात एकच टॉकीज होती. तिथे 'त्रिदेव' लागला होता. त्या गावात कामही दोन तीन दिवसाचं होतं. मी व माझ्या सहकारी मित्रानं, तीन दिवस रोज त्रिदेव पाहिला. एका गावात फिरती तंबू टॉकीज आली होती. तिथे दहा वेळा रीळ तुटत तुटत, एक डाव भुताचा पाहिला होता.

काही वेळा, एखाद्या मित्राच्या अंगात सैतान शिरायचा व तो काहीही करायचा. एकदा नाशिकला 'दो गज जमीन के नीचे' बघायला गेलो. हा पिक्चर खरं तर एक बरा भयपट आहे. आम्ही सगळ्यांनी तो आधी पाहीला होता. आता दुसऱ्यांदा जरी बघत असलो तरी गप बघावा की नाही. पण एकाच्या अंगात सैतान आला. त्यानं 'आता बघ हं, त्या पेटीतून हात बाहेर येईल बरं का', किंवा 'त्या गाडीच्या मागच्या सीटवर मुडदा आहे', वगैरे कॉमेंटरी सुरू केली. मग बाकीचेही चेवले व सगळं पुढचं सांगू लागले. आजूबाजूचे लोक जाम वैतागले होते. आमचे तीन तास मजेत गेले. थोडक्यात वाचलो असंही म्हणता येईल कारण अजून थोडावेळ गेला असता तर मारामाऱ्या झाल्या असत्या. 

नमनाला एव्हढं घडाभर तेल जाळायचं कारण असं की या सगळ्या प्रकारात काही व्यक्तिरेखा मला फार भावल्या. त्यामागे ती व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कलाकाराचा जेव्हढा हात आहे, तेव्हढाच ती व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या लेखकाचा व त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचाही आहे. गेल्या दोन लॉकडाऊनमधे अनेक चित्रपट पुन्हा पाहीले म्हणा, पाहावे लागले म्हणा, पण अनेक आवडलेल्या व्यक्तिरेखा पुन्हा भेटल्या, काही नव्यानं कळल्या. 

पुढल्या काही दिवसात अशा काही आवडलेल्या व्यक्तिरेखांबद्दल लिहीणार आहे, असं म्हणतोय. 

पिक्चरसंबंधीच लिहितोय तर त्याच परिभाषेत बोलायचं म्हणून हा 

ट्रेलर... 


Ⓒ मिलिंद लिमये




 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...