'पितृकृपा' नावाचा भला मोठा बंगला होता त्याचा. शिसवी देव्हारा असलेल्या देवघरातल्या विविध देवांना नमस्कार करून तो निघाला. तितक्यात बायकोनं केशरी दूध आणलं. ते पिता पिता तिच्याशी जुजबी काही बोलून तो बाहेर पडला. दारात पांढरीशुभ्र, चार बांगड्यावाली ऑडी उभी होती. रुबाबात ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून त्यानं हातातल्या महागड्या मोबाईलवरून कुणा कार्यकर्त्याला फोन लावला. यावेळच्या इलेक्शनला त्याला आमदारकीचा चान्स होता.
ही सगळी किमया होती वांग्यांची. मागल्या मोसमात त्यानं त्याच्या दहा एकरात वांगी लावली होती. त्याचे त्याला जवळपास एकशे दहा कोटी मिळाले होते. त्याच बळावर हे सगळं जुळून येणार होतं...
अचानक गाडीला जोरदार गचका बसला...
दचकून त्यानं पाहिलं तर मुकादमानं कमरेत लाथ घातली होती व तो ओरडत होता, XXX ऊठ. झोपा काय काढतो? ती खोकी काय तुझा बाप उचलणार आहे का?
त्यानं हताशपणे फडका खांद्यावर टाकला व ज्या जमिनीवर त्याच्या बापजाद्यांनी पोटापुरती पिकं काढली होती त्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या कारखान्यातली खोकी उचलायला चालू लागला...
Ⓒ मिलिंद लिमये
Mulshi Pattern
उत्तर द्याहटवाBack to reality...
उत्तर द्याहटवाभयानक दिवास्वप्न! पण वास्तव तर याहून भयाण आहे. पेकाटात लाथ बसली तरी, स्वप्नातून बाहेर यायची मानसिकताच नाही. एक सिरीयल संपून पुढची सुरु व्हावी.... किंवा आजच्या एपिसोडमध्ये जाग आली तरी उद्या नवा एपिसोड सुरूच... दिवास्वप्न तेच... आजच्या एपिसोडमध्ये सासू दुष्ट तर उद्या नणंद... पुढील दिवास्वप्न तसेच
उत्तर द्याहटवासुरु. या काळ झोपेतून जाग येणार का? यांचे करते करविते त्यांना पुन्हा अफूची गोळी देऊन झोपवणार ...सर्वार्थाने!