मुख्य सामग्रीवर वगळा

दिवास्वप्न

'पितृकृपा' नावाचा भला मोठा बंगला होता त्याचा. शिसवी देव्हारा असलेल्या देवघरातल्या विविध देवांना नमस्कार करून तो निघाला. तितक्यात बायकोनं केशरी दूध आणलं. ते पिता पिता तिच्याशी जुजबी काही बोलून तो बाहेर पडला. दारात पांढरीशुभ्र, चार बांगड्यावाली ऑडी उभी होती. रुबाबात ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून त्यानं हातातल्या महागड्या मोबाईलवरून कुणा कार्यकर्त्याला फोन लावला. यावेळच्या इलेक्शनला त्याला आमदारकीचा चान्स होता.

ही सगळी किमया होती वांग्यांची. मागल्या मोसमात त्यानं त्याच्या दहा एकरात वांगी लावली होती. त्याचे त्याला जवळपास एकशे दहा कोटी मिळाले होते. त्याच बळावर हे सगळं जुळून येणार होतं... 

अचानक गाडीला जोरदार गचका बसला...

दचकून त्यानं पाहिलं तर मुकादमानं कमरेत लाथ घातली होती व तो ओरडत होता, XXX ऊठ. झोपा काय काढतो? ती खोकी काय तुझा बाप उचलणार आहे का?  

त्यानं हताशपणे फडका खांद्यावर टाकला व ज्या जमिनीवर त्याच्या बापजाद्यांनी पोटापुरती पिकं काढली होती त्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या कारखान्यातली खोकी उचलायला चालू लागला... 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. भयानक दिवास्वप्न! पण वास्तव तर याहून भयाण आहे. पेकाटात लाथ बसली तरी, स्वप्नातून बाहेर यायची मानसिकताच नाही. एक सिरीयल संपून पुढची सुरु व्हावी.... किंवा आजच्या एपिसोडमध्ये जाग आली तरी उद्या नवा एपिसोड सुरूच... दिवास्वप्न तेच... आजच्या एपिसोडमध्ये सासू दुष्ट तर उद्या नणंद... पुढील दिवास्वप्न तसेच
    सुरु. या काळ झोपेतून जाग येणार का? यांचे करते करविते त्यांना पुन्हा अफूची गोळी देऊन झोपवणार ...सर्वार्थाने!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...