मुख्य सामग्रीवर वगळा

शरद

शरद....
तसा माझा कुणीच नव्हता. माझ्या आजोबांच्या मित्राचा, तात्यांचा, तो मुलगा. एकुलता एक. माझ्यापेक्षा खूपच मोठा. जवळजवळ माझ्या वडलांच्या वयाचा. पण आसपासचे सगळे त्याला नुसतं शरद म्हणायचे म्हणून आम्हीपण त्याला, नावापुढे काका, मामा वगैरे न जोडता, नुसतं शरद म्हणायचो.

तात्या एलआयसी मधून मोठ्या पदावरून निवृत्त झाले होते. बऱ्यापैकी पेन्शन मिळत असावं. बायको खूप आधीच वारली होती. घरी फक्त तात्या आणि शरदच असायचे. 'घरी असायचे' हा मात्र कोड्यात टाकणारा प्रकार होता. तात्या रिटायर झाल्यामुळे घरी असायचे यात काही विशेष नव्हते. पण शरदही? आमच्या घराच्या चार घरं पलीकडेच तात्यांचं घर होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत बघावं तेंव्हा शरद ओसरीवर, पट्टेरी कापड लावलेल्या लाकडी आरामखुर्चीवर बसलेला असायचा. बरं घरी आहे म्हणून घरच्या कपड्यात बसावं ना. पण हा, सकाळी सकाळी दाढी अंघोळ करून, पूर्ण सुटात, टाय लावून, डोक्यावर हॅट घालून बसलेला असायचा. कधीही बघा, शरद असाच दिसणार. काहीही काम करताना, वाचन करताना अथवा रेडिओ वगैरे ऐकताना दिसायचा नाही. कुणाशी बोलताना दिसायचा नाही. फक्त खुर्चीवर बसून रस्त्याकडे बघत असायचा. तात्याच रोज दोन वेळचं जेवण बनवत व त्याला खायला घालत. मात्र दर शनिवारी सकाळी त्याच त्या पूर्ण सुटात सायकलवरून मारुतीला जायचा.

लहानपणी मी त्याला बघून जाम टरकायचो. सायकलवरून जाताना सर्कशीतलं अस्वल गेल्यासारखा वाटायचा. पण जेंव्हा तो अत्यंत निरुपद्रवी आहे हे कळलं तेंव्हा भीतीची जागा कुतूहलाने घेतली. आधी मला तो वेडा वाटायचा. मग वाटायचं की बहुतेक 'सटकलेला' असावा. अनेकवेळा तात्या माझ्या आजोबांकडे येऊन त्याच्याबद्दल काहीबाही सांगून रडायचे, माझ्यावर सूड उगवतोय म्हणायचे. सगळंच गूढ होतं.

वास्तविक शरद लहानपणापासून अतिशय हुशार. त्याकाळी बोर्डात आलेला मुलगा होता तो. गणिताची खूप आवड होती. गणित विषयात पीएचडी करून प्राध्यापक व्हायची त्याची इच्छा होती. पण तात्या अतिशय हेकेखोर होते. त्यांना शरदनं इंजिनियर व्हायला हवं होतं. खूप वादावादी झाली बापलेकात. तात्या शेवटी त्याला म्हणाले की तू आधी इंजिनियर हो आणि मग जे हवं ते कर. शरदनं शांतपणे इंजिनियरिंग पूर्ण केलं, अर्थातच उत्तम मार्कांनी. रिझल्ट घेऊन घरी आला. तात्यांना खूप आनंद झाला. आता काय करणारेस? तात्यांनी विचारलं. शरदनं आरामखुर्ची ओसरीवर आणली व त्यावर बसला. म्हणाला, हे करणार आहे. म्हणजे? तात्या चकीत झाले. तुम्हीच म्हणालात ना, इंजिनियर हो आणि मग काहीही कर? मी आता इथेच बसणार....

पुढली जवळजवळ बावीस वर्षं तो तसाच तिथे बसला. काहीही न करता....

एके दिवशी तात्या वारले. हा जागचा उठला नाही. शेजाऱ्यांनीच सगळं उरकलं. बरोब्बर तीन दिवसांनी त्याच खुर्चीत, तसाच सूट घालून, शरदही गेला. मागले तीन दिवस, त्याला काहीही खायला मिळालं नव्हतं.

एका सूडाच्या कहाणीचा करुण अंत झाला होता......



© Milind Limaye

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...