मुख्य सामग्रीवर वगळा

दामलेमास्तर

हो...!
तोच तो मी दामलेमास्तर. 'बिगरी ते मॅट्रीक' मधला. माझ्या शिष्योत्तमानं, पुरुषोत्तमानं, ज्याच्यावर पानंच्या पानं खर्चली तो मीच. मीच तो सुलतान. मीच तो कर्दनकाळ, औरंगजेब, हरणटोळ. मीच तो पोरांना झोडून काढणारा. मीच तो पोरींना कावळे वगैरे म्हणणारा. मान्य आहे मला की कदाचित माझ्याकडून हे सगळं अति झालं असेल, पण आज थोडीशी माझीही बाजू समजून घ्या. तुम्ही म्हणाल, मास्तर आज इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय उपरती झाली? सांगतो. परवाच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुणीतरी गमतीत का होईना मला व माझे सहकारी चितळेमास्तर यांना उद्देशून एक पोस्ट टाकली. (आम्हीही हल्ली 'वर' बसून सगळं बघतो बरं). म्हणलं त्यानिमित्तानं इतक्या वर्षांत राहून गेलेलं बोलून घ्यावं.

कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. कोकणातल्या कुणाकडेही असत त्याप्रमाणे घरी थोडी कलमं, काजू, फणस होते. अर्ध्या खंडीची शेती होती. वडील साधे क्रमपाठी भिक्षुक होते. सहा बहीणी व तीन भाऊ धरून घरात आम्ही बारा चौदा तोंडं. खेड्यातले चार पाच यजमान व शंकराची रोजची पूजा यावर दोन वेळचं कसंबसं मिळायचं. अशा परिस्थितीत मॅट्रीक होऊन मी तालुक्याच्या प्राथमिक शाळेत शाळामास्तर म्हणून लागलो.

माझे वरिष्ठ सहकारी, चितळेमास्तर, यांच्याप्रमाणे ना मला मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजला जायला मिळाले ना मला कुणी मॅकेनझी प्रिन्सिपॉल भेटले, की ज्यांना बघून ह्या शिक्षणाच्या 'राष्ट्रकार्यात' शिरावे. आज तुम्ही मुलं अगदी सहजपणे मोठं झाल्यावर काय करायचं ते ठरवता. पण मला आजही सांगता येणार नाही की मी मला काय व्हायचे होते. चितळेमास्तरांचे तसे तर तुम्हा मुलांचे असे. पण मी केवळ एक पोटार्थी होतो.

माझ्या घरची परिस्थितीही वडिलांसारखीच होती. पाच सहा पोरं, सतत आजारी पडणारी बायको व कमावणारा मी एकटाच. गांजून गेलो होतो हो अगदी. मिळणाऱ्या पैशात आजचं निभायचं. पण उद्याचं काय? हा प्रश्न मरेपर्यंत छळत राहीला. परिस्थितीशी झगडण्यासाठी काय काय करायचो. म्हणे दामलेमास्तर चुकून कधी आजारी पडत नसत. आजारी पडायची चैन परवडणारी नव्हती हो मला. काही झालेच तर अंगावर काढायचो पण रजा नाही घ्यायचो. वाचवलेल्या रजेचे पैसे मिळायचे ना वर्षाच्या शेवटी. तेव्हढंच फाटलेल्या संसाराला एक छोटंसं ठिगळ....

तसंच त्या हिरव्या डगल्याचं, ज्यावरून मला हरणटोळ हे नाव पडलं होतं. संसाराचा गाडा ओढताना सगळेच रंग विरून गेले होते. हाच एक तेव्हढा हिरवा राहून गेला. थोरल्याच्या मुंजीत शिवला होता, धाकट्याच्या लग्नापर्यंत वापरला.....

पुरुषोत्तमानं लिहिलंय की चौथीतल्या दुसऱ्या एका, गाणीबिणी म्हणणाऱ्या मास्तरांच्या वर्गात जायची ते सगळे आतुरतेने वाट बघत होते. पण नेमका मीच पुन्हा त्यांना चौथीच्या वर्गावर आलो. खरं सांगू? ते चौथीचे मास्तर बदलून जावेत याची मीच खूप वाट बघत होतो. कारण ते गेल्यावर मीच चौथीवर जाणार होतो ना. चौथीच्या मास्तरांना तीन आणे पगार जास्त मिळत असे हो....

बहुधा हा सगळा परिस्थितीचा राग, हे वैफल्य, ही अगतिकता मुलांवर निघत असेल. कुणाला कानावर जानवं लावून बडवलं असेल, कुणाला 'कावळे' म्हणलं असेल, कुणाला गाढव, डुक्कर, रेडा म्हणलं असेल. पण शक्य असल्यास माझी बाजूही समजून घ्या. मुळात मी इतका कडवट नव्हतो हो. असो. ज्याचं त्याचं भाग्य....

असं म्हणतात की कुठल्याही मास्तरांचं आयुष्य हे त्यांचा शेवटचा शिष्य जिवंत असेपर्यंत असतं. पण आमचा पुरुषोत्तम (आमच्या चितळेमास्तरांचा पुर्ष्या), स्वतः मराठी मनात अमर तर झालाच पण आम्हा दोघा मास्तरांनाही अमर करून गेला.

चितळेमास्तरांचं ठीक आहे हो. ते खरंच अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. पण पूर्णपणे 'विद्यार्थी-अप्रिय' मास्तर असूनसुद्धा इतकी मोठी गुरुदक्षिणा देणारा शिष्य मिळाला हेच माझे या मनुष्यजन्मातले बहुधा एकमेव भाग्य......



© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...