मुख्य सामग्रीवर वगळा

बाप

त्याचं नाव कबांगा.

नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की तो कुठला. काळाकभिन्न, उंचापुरा पण शिडशिडीत, जन्मल्या जन्मल्या म्हशीनं पाय दिल्यासारखं चपटं नाक, जाडजूड ओठ, कुठल्याही टूथपेस्ट किंवा टूथपावडरच्या जाहीरातीत शोभतील असे पांढरेशुभ्र दात, जीन्स व टी शर्ट घातलेला हा साधारण तिशीचा इसम त्याच्या देशातल्या एका कंपनीच्या गेस्ट हाऊसचा सर्व काही होता. सर्व काही म्हणजे स्वयंपाकी तोच, भांडी घासणारा तोच, कपडे धुऊन इस्त्री करणारा तोच, झाडणार पुसणार तोच, वॉचमनही तोच आणि माळीही तोच. ही सगळी कामं करून मागल्या बाजूला एका खोपटवजा खोलीत तो एकटा रहायचा. सदैव हसतमुख. कधीही कंटाळलेला किंवा वैतागलेला दिसायचा नाही. काम करताना सतत काहीतरी गुणगुणत असायचा. ऱ्हिदमचा खूप चांगला अंदाज होता. एकदा मी लॅपटॉपवर 'झिंगाट' मधलं गाणं लावलं होतं त्यावर सुरेख नाचला. नंतर चार दिवस रोज तेच गाणं. 

हे सगळं घडलं, मी एकदा त्याच्या देशात, त्याच्या कंपनीत काही कामासाठी गेलो होतो तेव्हा. भल्या मोठ्या गेस्ट हाऊसमधे मी एकटाच होतो. त्यामुळे मला वेळ असेल तेंव्हा आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कबांगा बऱ्यापैकी शिकलेला होता. त्याच्या देशात एका पातळीपर्यंत शिक्षण फुकट पण कंपल्सरी आहे. तिथपर्यंत तो शिकला होता. त्याला भारत माहीत होता. वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्न तो मला विचारत असे. त्याच्या देशातल्या एकूण परिस्थितीमुळं थोडंफार शिकूनसुद्धा त्याला चांगली नोकरी नव्हती. पोटासाठी अखेर त्याने हे काम पत्करले होते.

गप्पा मारताना एकदा त्यानं सांगितलं की त्याला आठ मुलं आहेत. बायको कुठल्यातरी आजारपणात आधीच वारली होती. कबांगाला पगार तसा जेमतेमच होता. मी वैतागून त्याला विचारलं, "अरे, इतकी मुलं कशाला जन्माला घातलीस?" शांतपणे तो म्हणाला, "मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की." मी सुन्न झालो. हा बाप आहे का खाटीक? मी विषय वाढवला नाही.

एकदा कंपनीच्या लोकांनी शनिवार रविवार जोडून पिकनिकचा बेत आखला. कबांगाला हे समजताच तो हळूच माझ्यापाशी आला.

"सर, मी पण शनिवार रविवार सुट्टी घेऊ का?"

"का रे? कशासाठी?"

थोडक्यात सांगायचं तर पंचवीस तीस किलोमीटरवरील दुसऱ्या एका गावातल्या मिशनरी शाळेत त्याची मुलं शिकत होती. शिक्षण फुकट, जेवण फुकट, रहायला फुकट. त्याबदल्यात चर्चमधली कामं करायची. हा वेळ मिळेल तेंव्हा त्यांना जाऊन भेटत असे. शनिवारी सकाळी चालत निघायचा ते सरत्या दुपारी पोचायचा. रात्री तिथेच कुठेतरी झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना घेऊन गावात फिरायचा, त्यांना खाऊ घालायचा. दुपारी परत फिरायचा व रात्री उशिरा पुन्हा गेस्ट हाऊसवर हजर व्हायचा. ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला.

शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर मी त्याला थोडे पैसे दिले व बसनं जायला सांगितलं. तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे काहीतरी खुडबुड आवाजाने मला जाग आली. जेमतेम साडेपाच झाले होते. पहातो तर कबांगा महाशय निघायच्या तयारीत.

"का रे? इतक्या लौकर? बस तर ७ वाजता आहे ना?"

"हो सर. पण मी चालतच जातो. आज तुम्ही दिलेल्या पैशातून मी बसनी जाईन, पण दरवेळी कोण देणार आहे मला पैसे? उगाच नाही त्या सवयी लागायला नकोत. त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या पैशातून पोरांबरोबर जास्त मजा करीन, त्यांना खूप  खायला प्यायला घालीन."

स्वतःच्या कष्टांपेक्षा आज पोरांचे जास्त लाड करता येणार याचाच त्याला आनंद झाला होता. 'मोठी होईपर्यंत पाच सहा मरतीलच की' हा विचारही आता त्याच्या डोक्यात नव्हता. अवाक होऊन मी त्याच्याकडे पहात राहिलो. माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघता, मला बाय करून तो चालायलाही लागला.

जगात कुठेही जा, शेवटी बाप तो बापच.....

© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून