मुख्य सामग्रीवर वगळा

अप्पा

आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. त्यातली काही हुशार असतात, काही ढ असतात, काही कर्तबगार असतात, काही कुचकामाची असतात, चांगली असतात, वाईट असतात आणि काय काय. पण काही माणसं अशी असतात की ती काहीच नसतात. त्यांच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही.

अप्पा त्यातलाच. तो काहीच नव्हता. कुणालाच त्याच्याबद्दल काही वाटत नसे.....

तसं पहायला गेलं तर माझा लांबचा मामा लागायचा. इतका लांबचा की माझ्या आजीच्या भाषेत, 'एसटीनं दोन तास लागतील', इतका लांबचा. वाडवडीलांची सावकारी होती. त्यामुळे घरचं गडगंज होतं. चार पाच भाऊ होते. तीन चार बहिणी होत्या. अप्पा असातसा मधलाच. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात अप्पा शाळेत गेला का, काही शिकला का, असा कुणालाच प्रश्न पडला नाही. अप्पा नुसता बसून असे. अगदीच काही काम सांगितलं तर करायचा, पण इतर वेळी निवांत बसून असायचा. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....

कुठल्याही रंगाचा, जुन्या पद्धतीचा लॉंग शर्ट, घोळदार पायजमा, डोक्यावर चेपून बसवलेली गांधी टोपी, चार दिवसांचे वाढलेले दाढीचे खुंट, बसून खाल्ल्यामुळे किंवा खाऊन बसल्यामुळे सुटलेलं तोंद असा त्याचा अवतार होता. एव्हढा सावकाराचा मुलगा, अशा अवतारात रहात असे, पण कुणालाच त्याचं काही वाटत नसे....

कधी कुणाचं दळण टाक किंवा आणून दे, कधी भाजी आणून दे, कधी एसटीची तिकिटं काढून आण, कधी एखाद्या पोराला शाळेत सोड, कधी कुणाला तरी निरोप सांगून ये असली किडूकमिडूक कामं तो करायचा. पण मुख्य व आवडतं काम म्हणजे कुणीही काही कारणानं जेवायला बोलावलं की पोटाला तडस लागेपर्यंत जेवणं.  कुणालाच त्याचं काही वाटत नसे....

बहुतेक वेळा नगरपालिकेच्या पायऱ्यांवर, मुरलीधराच्या देवळात, कुणाच्या तरी घराबाहेरच्या कट्ट्यावर, एक पाय वर घेऊन नुसता बसलेला असायचा. आपण जन्माला येऊन नक्की काय केलं हा प्रश्नही त्याला बहुधा पडत नसावा. जाणाऱ्या येणाऱ्या कुणी चुकून कधी 'काय अप्पा?' असं विचारलंच तर 'होSSS' असा प्रतिसाद द्यायचा. बाकी एक शब्द नाही. तो बोलला काय नि नाही बोलला काय, कुणालाच त्याचं काही वाटत नसे....

सावकारांनी अप्पाचं लग्नही करून दिलं होतं. त्याची बायकोही डोक्यानं जरा कमीच होती. अप्पाचे इतर भाऊ अप्पाचा सगळा खर्च चालवीत. पण तरीही, दोन वरकड पैशांकरता व गावभरच्या कुचाळक्या करायला, त्याची बायको चार घरी पोळ्या करायला जाई. कुणालाच त्याचं काही वाटत नसे....

अप्पाला एक मुलगीही होती. ती मात्र खरोखर हुशार होती. अप्पाचा तिच्यावर खूप जीव होता. दहावी पास झाल्यावर अप्पाचा एक भाऊ तिला पुढील शिक्षणासाठी शहरात घेऊन गेला. मुलगी शहरात गेल्यावर मात्र अप्पा खूप उदास झाला. पूर्वी आम्ही भेटल्यावर जरा तरी चार शब्द बोलणारा अप्पा, अजिबात बोलेनासा झाला. दिवस ढकलणं यापलीकडे आता त्याला काही उद्योग नव्हता. त्याला ओळखणारी बहुतेक कुटुंबे आता शहरात स्थायिक झाली होती. त्यामुळे हक्कानं त्याला कामं सांगणारं, सणावाराला जेवायला बोलावणारं, गावात फारसं कुणी उरलं नव्हतं. आकाशाकडे बघत बसून असायचा.

एके दिवशी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर एक रेघोटीसुद्धा न उठवता, अप्पा मरून गेला.

कुणालाच त्याचं काही वाटलं नाही....


© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क