मुख्य सामग्रीवर वगळा

तीन अ. ल. क. (अति लघु कथा)

अलक १.

रोज संध्याकाळी घरी आल्याआल्या त्याला काहीतरी सटरफटर खायला लागतं. एरवी ती काहीतरी तयार ठेवतेच. पण आज तिचा उपास असल्यामुळे जाम कंटाळा आला होता. 'तूच येताना काहीतरी आण' असं सांगायला दोनदा फोन केला, पण 'व्यस्त' लागला. काहीतरी करायलाच पाहिजे याविचाराने ती किचनकडे वळली. तेव्हढयात बेल वाजली. तिनं दार उघडलं. आत येऊन त्यानं एक पुडकं तिच्या हातात ठेवलं व म्हणाला, आज तुझा उपास आहे ना म्हणून साबुदाणा वडे आणलेत....

डोळ्यात दाटलेल्या धुक्यात ते पुडकं कधीच दिसेनासं झालं होतं....

अलक २.

रिपरिप पावसातच ती घराजवळच्या मंडईत गेली होती. भाजी तर मनासारखी मिळाली, पण तसल्या त्या चिकचिकटात जड पिशव्या उचलायचं आता जिवावर आलं होतं. तेव्हढ्यात मागून एका कोवळ्या पण दणकट हातानं त्या पिशव्या उचलल्या. "क्लासमधून आलो तर बाबा म्हणले तू मंडईत गेली आहेस, म्हणून आलो पटकन... ", तो म्हणाला...

तिच्याच काळजाचा तो तुकडा आता तिच्या डोळ्यात मावत नव्हता....

अलक ३.

शाळेत असल्यापासून मी खूप आळशी आहे. विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नांना दीर्घ उत्तर अथवा पंधरा मार्कांसाठी निबंध वगैरे लिहायचं जाम जिवावर येत असे. थोडक्यात काहीतरी लिहून टाकायचो व नंतर बोलणी आणि / किंवा मार खायचो. ह्याच कारणामुळे अलक लिहायला सहज जमेल असं वाटलं होतं. एका झटक्यात तीन तरी अलक लिहून टाकायचा विचार होता. पण लिहायला बसल्यावर ते तितकंसं सोपं नाहीये असं लक्षात आलं. कशाबशा दोन लिहील्या. तिसरी काही केल्या जमेना.

सरळ 'जमत नाहीये' असं तुम्हाला सांगून टाकावं म्हणून तसं लिहायला घेतलं, तर मधल्यामधे माझ्या अलक लिखाणाचीच एक अलक झाली...  

टिप्पण्या

  1. Tujha praamaanik panaa aavadla

    Tasehi tujhe likhaan yogya meter madhe aste

    Cheers

    उत्तर द्याहटवा
  2. अलक ची झलक आवडली. कवितेत चारोळी प्रकार रूढ झाला त्यासारखाच अलक प्रकार आवडला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत