मुख्य सामग्रीवर वगळा

भंवताल

दोन तीन दिवसांपूर्वी एका शब्दप्रयोगाबद्दल काही शंका होती म्हणून नेटवर सर्फिंग करत होतो. त्या भानगडीत एक वेगळीच माहिती हाताला लागली. ती अशी की, सर्वसामान्यपणे एक माणूस त्याच्या आयुष्यात तीस लाख चेहरे बघतो. त्यातील जास्तीत जास्त तीन हजार चेहरे माणसाच्या लक्षात राहतात. जी माणसं लोकांमध्ये वावरतात ती तर जवळजवळ साडेचार कोटी चेहरे बघतात म्हणे. आता नेटवर काय, कुठल्याही विषयावर काहीही माहिती मिळते. पण ह्या माहितीच्या तुकड्याने माझ्या डोक्यात मात्र विनाकारण चक्र फिरवायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो असा की आपल्या लक्षात नक्की राहतं काय? चेहरे की माणसं? जास्त विचार केल्यावर असं लक्षात आलं की चेहरा ही कुठल्याही माणसाची आयडेंटिटी असते. विशिष्ट चेहऱ्यामुळेच विशिष्ट व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. बघा ना, केवळ चेहऱ्यामुळेच आपल्याला माधुरी दीक्षित आणि मायावती यांच्यातला फरक कळतो. तसं नसतं तर.... अरे बापरे....

ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीत मी एकेक चेहरे आठवू लागलो. काय काय प्रकार सापडले बघा. आईवडील, नातेवाईक, शेजारपाजारचे, गल्लीतले, सोसायटीतले,  शाळाकॉलेजमधले, ऑफिसमधले, विविध दुकानदार, पोस्टमन, कामवाल्या बायका, दूधवाला, पेपरवाला, त्याशिवाय मी ज्यांना ओळखतो पण जे मला ओळखत नाहीत असे नरेंद्र मोदी, राहुल गांधी, पुतीन, ट्रम्प. चेहरेच चेहरे. पण काही चेहरे असे होते की जे फक्त चेहरेच मला माहीत आहेत. त्या चेहऱ्यामागच्या माणसाला, त्याच्या नावागावाला, मी कधीच भेटलो नाहीये. कितीतरी होते असे...  

प्राथमिक शाळेत असताना, शाळेच्या रस्त्यावर एक गॅरेज होतं. तिथे एक मेकॅनिक होता. त्याकाळी पन्नाशीचा असेल. बराचसा दीपक शिर्केसारखा दिसणारा हा माणूस रोज आम्ही तिथून जात असताना, का कुणास ठाऊक, 'खूप शिका रे पोरांनो' असं म्हणायचा. आजही एखाद्या सिनेमात दीपक शिर्के दिसला की मला तो मेकॅनिक आठवतो. तसंच मी ज्या दुकानातून सायकल दुरुस्त करून घ्यायचो तिथं एक मेकॅनिक होता. हवा भरायला सायकल घेऊन गेल्यावर, कितीही वेळ उभं राहिलं आणि कितीही वेळा हवा भर सांगितलं तरी त्याला फरक पडायचा नाही. गल्ल्यावरून मालकानं खेकसून अरे हवा भर की असं म्हणलं की मगच तो हातातलं काम सोडून हवा भरायचा. 

एक आजोबा आठवले. एखाद्या संध्याकाळी आम्ही रहायचो त्या वाड्यात येऊन मोठ्यामोठ्याने श्लोक, अभंग, आर्या, ओव्या, म्हणायचे. काय प्रॉब्लेम होता त्यांचा माहीत नाही. पैसे घ्यायचे नाहीत. पण कणीक आणि भाजी द्या म्हणायचे. असाच एक नाथपंथी साधू होता. चालत जाताना त्याच्या गळ्यातलं मोठ्ठ घुंगरू, त्याच्या दोन्ही मांड्यांवर आपटत छळळम, छळळम, असा आवाज करत जायचा. त्याच्या त्याच्या नादात असायचा पण जाम टरकायचो आम्ही त्याला. सुमारे बारा पंधरा वर्षांपूर्वी रांजणगावच्या गणपतीच्या देवळाबाहेर एक आंधळा, म्हातारा वारकरी अभंग म्हणत बसायचा. त्या काळात तिथे 'श्री क्षेत्र रांजणगांव' झालं नव्हतं. मोजून चारपाच माणसं असायची. आता बघाल तर वर्षभर नुसती जत्रा भरलेली असते. छटाकच्या मापट्याएव्ह्ढ्या तोंडाचा तो वारकरी उगाचच माझ्या लक्षात आहे. 

आणखी एक माणूस होता. 'फाटका माणूस' असं जर कुठे वर्णन आलं तर हा माणूस माझ्या डोळ्यासमोर येतो. तो हातगाडी ढकलत जाताना 'च्यांच्यां च्यांSSS च्यांSSS मुडाच्यांSSS' असं ओरडायचा. बघायला गेलं तर मोड आलेली कडधान्य विकत असायचा. असाच एक जण मंडईत होता. जी कुठली भाजी विकत असेल, तिचं नाव घेऊन एका विशिष्ट स्टाईलनं ओरडायचा. 'वांगी आलेSSS, पाचला दिलेSSS'. 'मटार आलेSSS, वीसला दिलेSSS'. आता आवाज आणि वास हे शब्दात पकडणं शक्य नसतं, त्यामुळे तो नक्की कसा ओरडायचा ते मला सांगता येत नाहीये. सिटी पोस्टाच्या चौकात एक माणूस एका मोठ्या गोल चपट्या डब्यातून आलेपाक विकायचा. कुठल्याही गोष्टीत 'एका गावात एक गरीब माणूस रहात असे' असं वाचलं की मला हा आलेपाकवाला माणूस आठवतो.

एक म्हातारी होती. घराजवळच्या एका शाळेबाहेर चिंचा, बोरं, आवळे विकायला बसायची. बघावं तेव्हा हुडहुडी भरल्यागत अंगाभोवती पदर लपेटून असायची. गंमत म्हणजे त्या तिच्या बसायच्या जागेव्यतिरीक्त मी तिला कधीही, कुठेही येताना जाताना पाहिलं नाहीये.आणखी एक जण होता. आय एस जोहर सारखा दिसायचा. सीझनप्रमाणे सायकलला टोपल्या लावून पेरू, हरबरा वगैरे विकायचा. त्याच्या सायकलजवळ गेलं की 'काय हव्याय' असं विनाकारण खेकसायचा. अरे पेरू विकतोयस ना? दिसतंय आम्हाला. काय हव्याय काय?

मी गावात राहायचो तिथे जवळ एक हौद होता. रोज सकाळी एक माणूस तिथे दहाबारा रिक्षा धुवायचं काम करायचा. थोडा अर्धवट होता.  स्वतःला साईबाबा समजायचा. रिक्षा धुऊन झाल्या की ते रिक्षा पुसायचं पिवळं फडकं डोक्याला बांधून, एका पायावर दुसऱ्या पायाची चौकट करून, करंगळी व अनामिकेच्या बेचक्यात धरून सिगारेट ओढत बसायचा. मधेच उगीचच आकाशाकडे बघत 'मालिक सब देख रहा है' असं ओरडायचा. असाच अजून एक होता. कुठल्यातरी ऑफिसमधे शिपाई असावा, कारण कायम खाकी शर्ट व खाकी पॅण्ट घालून असायचा. चालताना चपला घासत, फसक फसक असा अत्यंत तापदायक आवाज करत जायचा. पण त्यावरून कुठल्या दिवशी त्याचा पगार झालाय, त्याचा अंदाज बांधता येत असे. ज्या दिवशी पगार त्या दिवशी चपलेचा आवाज सर्वात कमी.

घराजवळच्या एका प्रकाशनसंस्थेच्या मालकाच्या गाडीचा म्हातारा ड्रायव्हर, वखारीतला एक लाकूडफोड्या, लाह्या, फुटाणे विकायला येणारा, दादा कोंडकेंसारखा दिसणारा एक, सागरगोटे वगैरे विकायला येणारी एक व्यंकी, कपडे घेऊन भांडी देणारी एक बोहारीण (वाड्यातल्या बायका आणि ही बोहारीण यांच्यात चालणारी घासाघीस हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा), कल्हईवाला, सायकलच्या कॅरियरवर बसून हॅण्डलवरच्या चाकावर चाकूसुऱ्यांना धार लावणारा एक मुसलमान म्हातारा, फक्त श्रावणातच आघाडा, दुर्वा, फुलं विकायला येणारी एक बाई, जोगळेकर डॉक्टरांचा कंपाउंडर, दत्ताच्या देवळातला मारवाडी, बिस्किटांच्या दुकानाचा पारशी मालक (ह्याच्या लांब नाकाचं, मी लहान असताना मला जाम हसायला यायचं), एका मठातला साधारण मधू आपटे सारखा दिसणारा पुजारी. किती आठवू अन किती नको.....

असे कितीतरी चेहरे, ज्यामागची माणसं कधीच आपल्या परिचयाची होत नाहीत.  कुठल्यातरी एखाद्या वळणावर मी वळलो, रस्ते बदलले, तशी ही माणसं माझ्या रोजच्या रूटिनमधून वजा झाली. पण आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर ती माझ्या जीवनाचा, माझ्या भावविश्वाचा, कळत नकळत, एक भाग होती. प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या चेहऱ्यामागच्या माणूसपणाचा हा एक भाग असतोच. तुमच्याही आहे, माझ्याही आहे. तसा तो असतंच राहणार.... 

टिप्पण्या

  1. अरे खरच. अधी माणसे आमच्या अवतीभोवती आहेत/होती. स्वतः शी कनेक्ट होत गेलो. मस्तच.

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या मनाच्या सांदी कोपऱ्यात दव टिपाव तसे विविध चेहरे तू टिपून ठेवलेले आहेस आणि ब्लॉग मधून सादर केलेस. सुंदर !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत