मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - तो व ती

ती मुंबईहून पुण्याला आलेली असते. खास पुणेरी रस्ते व बोळ, कसलाही पत्ता न लागू देता पत्ता सांगायची पुणेरी पद्धत, यामुळे आधीच वैतागलेली ती, त्याला भेटते. त्यानंतर तिची गाठ पडते ती खास पुणेरी लोकांशी व पाट्यांशी. या सगळ्याचा पूर्ण वीट येऊनसुद्धा काम पूर्ण करण्यासाठी ती थोडावेळ पुण्यातच थांबायचं ठरवते. आता तिची पुन्हा गाठ पडते त्याच्याशी. 

थोड्याश्या अपरिहार्य परिस्थितीत ती त्याची कंपनी मान्य करते आणि सुरू होतो मुंबई विरुद्ध पुणे असा एक नेहमीचा व आवडीचा वाद. कळत नकळत आपणही त्या वादाचा एक भाग होऊन जातो. पुणे मुंबई वरून सुरू झालेला वाद हळूहळू व्यक्तिगत विषयांकडे वळतो. 

तिचा एक ब्रेकअप झालाय तसाच त्याचाही झालाय. दोघंही आपापल्या एक्स बद्दल सांगत असताना तिची अतिशय व्यवहारी, वर्तमानात जगायची, झालं गेलं मागे सोडून पुढे जाण्याची खास मुंबई पद्धतीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. तर दुसऱ्या बाजूला तो बराचसा स्वप्नाळू, पुणेरी परंपरावादी, वरकरणी खुशालचेंडू, थोडासा आतल्या गाठीचा पण कविमनाचाही.

पुणे शहरातून फिरताना व नंतर सिंहगडावर फिरताना त्या दोघांचा उंदीरमांजरासारखा एकमेकांना खेळवण्याचा खेळ सध्याची लग्नपद्धती, मुलामुलींचा लग्नसंस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन, एकत्र कुटुंबपद्धती इत्यादि विषयांवर हलकंफुलकं भाष्य करत जातो. 

एका प्रसंगात तो तिला म्हणतो की ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण नात्यांना उलगडूच देत नाही. सगळं काही, अगदी आपल्या पार्टनरसकट सगळ्यांना आपण गृहित धरतो. वाद उद्भवतात ते त्यामुळेच. नाती तुटतात तीही त्यामुळेच.  

चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटात आपल्याला कळतं की ती ज्याच्यासाठी पुण्याला आलेली असते तो तोच आहे आणि मुख्य म्हणजे ती कोण आहे हे त्याला माहीत असतं पण तिला त्याचा सुतराम पत्ता नसतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर योगायोगाने सुरू झालेला हा योगायोग व मुलगी बघण्याचा एक वेगळा प्रयोग दोन तास केवळ मनोरंजनच करत नाही तर लग्न व त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न यावर एक छान भाष्य करून जातो. 

स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहताना जोडीदाराच्या विचारांचाही आदर करायचा धडा देणारी ही दोघं, तो व ती, मला फारच भावले. 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या


  1. मराठी चित्रपटांमधील एक सुंदर भट्टी जमलेला हा चित्रपट. त्याची सुंदर मीमांसा या ब्लॉगमधून केली आहे. उंदीर मांजराचा खेळ ही उपमा छान आहे. एका अर्थाने लग्नानंतर नवरा बायकोत हाच खेळ चालतो. त्याचेच लग्नापूर्वीचे एक रूप यात चितारले आहे. हलका-फुलका पण या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा. ब्लॉगमधून यादृष्टीने हाच सिनेमा परत पहिल्याच समाधान!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...