मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दोन ओंडक्यांची होते... (उत्तरार्ध)

पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. माझेही बहुतांशी अनुभव तसेच आहेत. आता युनिफॉर्म घातल्यामुळे टर्रेबाजी करायला हुरूप येतो का विशिष्ट काम करताना येणाऱ्या अनुभवांमुळे तसं वागलं जातं हा वेगळा विषय आहे. बट फॅक्ट रिमेन्स. मात्र अपवादात्मक का होईना, युनिफॉर्म मधल्या काही चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. आठवणींच्या वादळात कितीतरी ओंडके आज एका लाटेनं जवळ येताहेत व दुसऱ्या लाटेनं लांब जाताहेत. लहानपणापासून ज्याची आपल्याला भीती घातली जाते तो पहिला युनिफॉर्म म्हणजे पोलीस. गप जेव नाहीतर पोलिसाला बोलवीन, या व अशा अनेक धमक्या आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे कुठेही पोलीस दिसला की पोटात बाकबुक होतंच. त्यात चित्रपटांमधे पाहिलेले पोलीस यात आणखी भरच घालतात. नंतरच्या काळात काही पोलीस मित्रही झाले, तसेच काही वर्गमित्र पोलीस झाले. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूही कळली. पण जो पोलीस माझ्या लक्षात आहे तो खूप वेगळा आहे. ह्या पोलिसाला मी पाहिलं त्याकाळी हवालदार मंडळी हाफ पॅन्ट व पठाणी सॅंडल घालून, पोटऱ्यांना खाकी रंगाच्या पट्ट्या ...

दोन ओंडक्यांची होते...

लहानपणापासून माणसांचं निरीक्षण करण्याचा मला छंदच आहे. वेगवेगळी माणसं, त्यांचे हावभाव, लकबी, वेषभूषा यांचं निरीक्षण करून विविध वैशिष्टयांच्या मनात नोंदी करत रहाणं हा माझा एक आवडता टाईमपास आहे. गेले बरेच आठवडे मी अशा वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल लिहीत होतो. मागल्या आठवड्यात नुसत्या चेहऱ्यांबद्दल लिहिले. असे चेहरे की ज्या मागचा 'माणूस' मला माहीत नाहीये, पण जे मी अनेक वेळा पाहीले होते. काही चेहरे मात्र असे आहेत की जे मी एकदाच पाहीलेत आणि दोनशे टक्के ते चेहरे पुन्हा मी कधीही पाहणार नाहीये. हे चेहरे एकदाच दिसण्याचं मुख्य व एकमेव कारण म्हणजे ह्या चेहऱ्यांना मी प्रवासात भेटलोय. सुमारे पाच मिनिटांपासून अठरा वीस तासापर्यंतचाच सहवास. पण काही ना काही कारणानं हे चेहरे व त्यामागचा माणूस, माझ्या आठवणींच्या विश्वात अढळ स्थान मिळवून बसलेत. ह्या यादीत सर्वप्रथम येतो सायकलवरून जाणारा एक मध्यमवयीन गृहस्थ. मी व माझा मित्र काही कारणानं मोरगावमार्गे बारामतीला चाललो होतो. त्याकाळी माझ्याकडे सेकंडहँड फियाट होती. मोरगाव मागे टाकून पुढे निघालो, तेवढ्यात दोन गचके खाऊन गाडी बंद पडल...

भंवताल

दोन तीन दिवसांपूर्वी एका शब्दप्रयोगाबद्दल काही शंका होती म्हणून नेटवर सर्फिंग करत होतो. त्या भानगडीत एक वेगळीच माहिती हाताला लागली. ती अशी की, सर्वसामान्यपणे एक माणूस त्याच्या आयुष्यात तीस लाख चेहरे बघतो. त्यातील जास्तीत जास्त तीन हजार चेहरे माणसाच्या लक्षात राहतात. जी माणसं लोकांमध्ये वावरतात ती तर जवळजवळ साडेचार कोटी चेहरे बघतात म्हणे. आता नेटवर काय, कुठल्याही विषयावर काहीही माहिती मिळते. पण ह्या माहितीच्या तुकड्याने माझ्या डोक्यात मात्र विनाकारण चक्र फिरवायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो असा की आपल्या लक्षात नक्की राहतं काय? चेहरे की माणसं? जास्त विचार केल्यावर असं लक्षात आलं की चेहरा ही कुठल्याही माणसाची आयडेंटिटी असते. विशिष्ट चेहऱ्यामुळेच विशिष्ट व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. बघा ना, केवळ चेहऱ्यामुळेच आपल्याला माधुरी दीक्षित आणि मायावती यांच्यातला फरक कळतो. तसं नसतं तर.... अरे बापरे.... ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीत मी एकेक चेहरे आठवू लागलो. काय काय प्रकार सापडले बघा. आईवडील, नातेवाईक, शेजारपाजारचे, गल्लीतले, सोसायटीतले,  शाळाकॉलेजमध...

वेव्हलेंग्थ

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एखादा माणूस असा भेटतो की ज्याला आपण आधी कधी पाहिलेलंही नसतं. पण काही वेळातच वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत धागे जुळतात. सोप्या मराठीत सांगायचं तर 'वेव्हलेंग्थ' जुळते. त्या दोघांची वेव्हलेंग्थ अशीच जुळली. दोघांपैकी जो मोठा होता त्याला तीन मुली होत्या. त्यापैकी थोरल्या दोघींची लग्न होऊन त्यांना पोरंही झाली होती. तिसरं शेंडेफळ जरा लाडोबा होतं. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. बापानं आजवर जवळजवळ पंचवीस स्थळं आणली होती. पण हिला एक काही पसंत पडत नव्हतं. कोणी चम्याच आहे, तर कोणी राक्षस आहे. कोणाची आईच माकडीणीसारखी दिसतेय, तर कोणाचा बापच जाडभिंग्या आहे, असली कारणं सांगून नकारघंटा ठाणठाण वाजत होती. पण आपल्या ह्या अप्सरेगत शेंडेफळासाठी तो चपला झिजवत होता. अचानक एकेदिवशी शेंडेफळानंच त्याचा प्रॉब्लेम सोडवला. ऑफिसमधून येताना एकाला घेऊन आली व ह्याच्याशी मी लग्न करतेय म्हणून ओळख करून दिली. एकूण बरा वाटलं तो त्याला. पण शेवटी बापाचं काळीज होतं ते, काळजी तर वाटलीच. काळजी वाटणंही स्वाभाविक होतं. खूप कष्टातून तो पुढं आला होता. पाच बहिणींचा एकटा भाऊ होत...

तीन अ. ल. क. (अति लघु कथा)

अलक १. रोज संध्याकाळी घरी आल्याआल्या त्याला काहीतरी सटरफटर खायला लागतं. एरवी ती काहीतरी तयार ठेवतेच. पण आज तिचा उपास असल्यामुळे जाम कंटाळा आला होता. 'तूच येताना काहीतरी आण' असं सांगायला दोनदा फोन केला, पण 'व्यस्त' लागला. काहीतरी करायलाच पाहिजे याविचाराने ती किचनकडे वळली. तेव्हढयात बेल वाजली. तिनं दार उघडलं. आत येऊन त्यानं एक पुडकं तिच्या हातात ठेवलं व म्हणाला, आज तुझा उपास आहे ना म्हणून साबुदाणा वडे आणलेत.... डोळ्यात दाटलेल्या धुक्यात ते पुडकं कधीच दिसेनासं झालं होतं.... अलक २. रिपरिप पावसातच ती घराजवळच्या मंडईत गेली होती. भाजी तर मनासारखी मिळाली, पण तसल्या त्या चिकचिकटात जड पिशव्या उचलायचं आता जिवावर आलं होतं. तेव्हढ्यात मागून एका कोवळ्या पण दणकट हातानं त्या पिशव्या उचलल्या. "क्लासमधून आलो तर बाबा म्हणले तू मंडईत गेली आहेस, म्हणून आलो पटकन... ", तो म्हणाला... तिच्याच काळजाचा तो तुकडा आता तिच्या डोळ्यात मावत नव्हता.... अलक ३. शाळेत असल्यापासून मी खूप आळशी आहे. विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नांना दीर्घ उत्तर अथवा पंधरा मार्कांसाठी निबंध व...

नंदी

पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं. नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती. त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतर...

गिरणीवाली

"कशापाई येवडी राबतीया तू? ज्यानं चोच दिलीयं त्यो चारा बी दील..." कोणी एक मावशी गिरणीवाल्या बाईला दोन शब्द सुनावत होती. "अवं कमळीच्या आजी, चारा त्यानं दिला तरी तिथवर जायाला पंख तर पाखरालाच मारावे लागतात की..." गावातल्या आमच्या घराजवळच्या एका गिरणी कम दुकानातला हा संवाद गेली किमान चाळीस वर्षं माझ्या लक्षात असेल. कमळीच्या आजीला अशा तऱ्हेने उलटं सुनवायचा गिरणीवालीला पूर्ण हक्क होता. सारा आसमंत तिला गिरणीवाली बाई असंच म्हणायचा, कारण तिचा नवरा गिरणीवाला होता. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आळीच्या कोपऱ्यावर, एका मोठ्या गाळ्यात त्यांची पिठाची गिरणी होती. गाळ्याच्या एका भागात नवऱ्याची गिरणी व दुसऱ्या भागात गिरणीवाल्या बाईचं गोळ्या, बिस्किटं, पेन्सिली, वह्या, सिगरेटी, तंबाकू असं काहीबाही विकायचं फुटकळ दुकान होतं. गिरणीजवळच्याच एका वाड्यात त्यांचं बिऱ्हाड होतं. गिरणीवाला रोज सकाळी लवकर गिरणी उघडायचा ते पार रात्रीपर्यंत. गिरणीवाली बाई संसार सांभाळून जमेल तसं तिचं दुकान चालवायची. गुरुवारी गिरणीला सुट्टी असायची. त्या दिवशी दोघही जण जात्याच्या पाळ्यांना टाकी लावत बसलेले ...