हे जे एक शहर आहे ना, ते इतर शहरांपेक्षा खूपच वेगळं आहे. सायकलींचं शहर, दुचाकींचं शहर, शहाण्या माणसांचं व विद्वानांचं शहर, पेन्शनरांचं शहर अशा विविध विशेषणांनी हे शहर जगप्रसिद्ध आहे. शहरात व उपनगरात पेन्शनरांचे अनेक ग्रूप्स आहेत. जगातल्या प्रत्येक घटनेवर मत व्यक्त करणे व जगातल्या प्रत्येकाला सल्ले देणे, हे या ग्रूप्सचे मुख्य व एकमेव काम असते.
अशाच एका ग्रूपमधे दोन ज्येष्ठ तरुण होते. मत व्यक्त करणे व सल्ले देणे या ग्रुप ऍक्टिव्हिटीजमधे ते हिरीरीने सहभागी होत. मनाने जरी तरुण असले तरी खरोखरचे आजोबाही झाले होते. इतर मेंबरांपेक्षा या दोघांची मैत्री अधिक घट्ट होती. खरं तर त्यांची ओळख या ग्रुपमधे आल्यानंतरच, पर्यायाने निवृत्त झाल्यानंतरच, झाली होती. पण प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सोडता, एकूण तब्येत ठणठणीत होती. त्यामुळे विविध ठिकाणी जाऊन, चमचमीत पदार्थ 'चेपणे' हा त्यांच्या मैत्रीतला मुख्य दुवा होता. त्यावरून कंपूतील इतर मेंबर त्यांची थट्टाही करत.
पहिले आजोबा शहरातल्याच मध्यभागातल्या एका प्रसिद्ध पेठेत लहानाचे मोठे झाले होते. शहराजवळच्या औद्योगिक भागातील एका नामवंत कंपनीमधून मोठ्या पदावरून निवृत्त होऊन आता पेठेइतक्याच प्रसिद्ध अशा एका उपनगरात रहात होते.
दुसरे आजोबा मूळ मराठवाड्यातल्या एका दुष्काळी खेड्यात वाढले होते. घरी अठरा विश्वे दारिद्रय, आई वडील शेतमजूर, खाणारी दहा तोंडं, जातीपातींच्या भानगडीतून येणारी अपरिहार्य अवहेलना अशा परिस्थितीतून पुढे आले होते. स्वकष्टातून शिकून पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले. सरकारी नोकरीतील बदलीची सव्यापसव्ये सांभाळून, निवृत्तीनंतर अखेर याच उपनगरात स्थायिक झाले होते.
टेकडीवरून खाली उतरल्यानंतर एका गल्लीतील उडपी अण्णाकडे अतिशय सुरेख इडली चटणी मिळते यावर दोघांचंही एकमत होतं. आठवड्यातून दोनदा तरी ते दोघे तिथली इडली खायला जात. शेजारशेजारच्या दोन टेबलांवर बसून गप्पा मारत, ते इडलीचा आस्वाद घेत.
असेच एक दिवस दोघे तिथं गेले. इडली खाऊन झाल्यावर एक आजोबा काउंटरवर अण्णाशी गप्पा मारत होते. दुसरे हात धुवायला गेले होते. तेव्हढ्यात 'कार्यकर्त्यांचं' एक टोळकं तिथं आलं.
"काय रे म्हाताऱ्या? एव्हढं सगळीकडे सांगून, ग्वरमिंटनं कायद करून बी तू वागायचं तेच वागतोस ना?"
एकदम ओढवलेल्या प्रसंगाने आजोबा गांगरले. अण्णालाही काही कळेना. त्यातल्या मुख्य टग्यानंच पुढं बोलायला सुरुवात केली.
"बाहेर मोठ्या दोस्तीच्या गप्पा मारतोस आनी हितं मात्र बरोब्बर वेगळ्या बाकडयावर खायला बसतोस नं? तुम्हा लोकांना फटकावूनच काढायला पायजे...."
तेव्हढ्यात दुसरे आजोबा तिथे पोचले. क्षणात सगळा प्रकार त्यांच्या ध्यानात आला.
"मूर्ख माणसा.." ते गरजले. "ये जरा इकडे. बघ स्वतः इथे काय दिसतंय ते" असे म्हणून त्यांनी त्या टग्याला आत खेचले.
"ह्या दोन टेबलांमधली गॅप बघ. बघितलीस? आता आमच्या दोघांची उंची बघ. बघितलीस? मूर्ख माणसा, अरे आम्ही दोघं एका टेबलावर बसलो ना तर आमच्या लांब पायांमुळे आम्हाला नीट बसता येत नाही. म्हणून आम्ही शेजारशेजारच्या टेबलावर बसतो. याद राख जर पुन्हा अर्थाचा अनर्थ केलास आणि माझ्या मित्राला काही बोललास तर..." असं म्हणून त्या टोळक्याला बाजूला करून ते चालायला लागले.
ताठ मानेनं जाणाऱ्या त्या दोघा मित्रांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघायचं धैर्य एकाही कार्यकर्त्यापाशी उरलं नव्हतं......
© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा