हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ देव, दिलीप आणि राज
यांनी गाजवला. एकूणच सुवर्णयुग होते ते. गीत, संगीत, नृत्य, अभिनय, प्रत्येक बाबतीत. ह्या तिघांची, विशेषतः दिलीप आणि
राज कपूर यांची गाणी, त्यातल्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहीली आहेत, राहतील. या
तिघांपैकी राज कपूर हा यशस्वी दिग्दर्शकही होता. (यातील यशस्वी हा शब्द महत्वाचा).
मात्र स्वतःचे असोत किंवा दुसर्या दिग्दर्शकांचे असोत, राज कपूरनी अभिनयाच्या बाबतीत डावे उजवे कधीच केले
नाही. अर्थातच आज त्याच्या गाण्यांविषयी बोलताना हे महत्वाचे ठरेल. कारण 'त्याच्या' गाण्यांबद्दल
बोलताना काही गाणी अशीही असणार आहेत, जी त्यानी गायलेलीच नाहीयेत. Confusing? बघूया...
देव व दिलीप यांना राज कपूर सारखी परंपरा नव्हती.
राजकपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी नाटक क्षेत्रातील व नंतर हिंदी
चित्रपटातील एक नामवंत कलाकार होते. जुन्या पिढीतील रसिकांना आजही त्यांचा 'सिकंदर' आणि मुघले आझम
मधला 'अकबर' नक्की आठवतो. जरी
वडिलांकडून वारसा मिळाला, तरी राजकपूरने स्वतःची विशिष्ट शैली विकसित केली. ह्या
शैलीवर चार्ली चॅप्लिनच्या 'भटक्या' (tramp) चा मोठा प्रभाव
होता. त्याच्या गाण्यांमधेसुद्धा हा प्रभाव दिसून येतो. भटक्याच्या भूमिकेमुळे
राजच्या अभिनयात बेफिकीरपणा, अवखळपणा आणि चटका लावणारे वास्तव यांचे सुरेख मिश्रण
बघायला मिळते.राजची अनेक गाणी मला आवडतात. थोडे त्याबद्दल बोलूया.
ह्या अभिनयसम्राटाची शेकडो गाणी आहेत ज्यावर भरभरून
लिहीता येईल. पण श्रीखंड कितीही आवडले म्हणून तडस लागेपर्यंत खाऊ नये. म्हणून
थोड्याच गाण्यांबद्दल लिहीतो आहे.
१९५९ चा कन्हैया हा तसा काही राजकपूर वा नूतन यांचा
फार भारी वगैरे चित्रपट नाही. पण 'रूक जा ओ जानेवाली रूक जा', 'मुझे तुमसे कुछ भी ना चाहीये' व 'याद आई आधी रातको
कल रात की तौबा' ह्या तीन गाण्यांसाठी हा चित्रपट लक्षात रहातो.
गावातला उडाणटप्पू, दारुडा तरूण राज त्याच्या बाटलीला उद्देशून रूक जा ओ
जानेवाली रूक जा म्हणत असतो. पण मधेच नूतनचे
शॉट्स टाकून असा भास निर्माण होतो की हे गाणे तिच्यासाठीच म्हणले जातेय.
नंतर मात्र परिस्थिती बिघडत जाते. राज नूतनच्या कृष्णप्रेमाचा गैरफायदा घेऊ बघतो.
गाव पंचायत काळानुरुप काही विचित्र निर्णय देते. अशा स्थितीत राज म्हणतो, मुझे तुमसे कुछ भी
ना चाहीये, मुझे मेरे हालपे
छोड दो. ह्या गाण्यात आधीचा राज पूर्णपणे संपलेला असतो. ह्या दोन परिस्थितींमधला
बदल राजने जो दाखवलाय ना, तो जरूर बघण्यासारखा आहे.
त्याआधी एक वर्ष म्हणजे १९५८ मधे राजचा परवरीश आला
होता. हॉस्पिटल मधील योगायोगात, आईवडील स्वतःचे आणि एका वेश्येचे अशी दोन मुले घेऊन
घरी येतात. खुद्द त्यांनाही माहीत नसते की त्यांचा कोण आणि तिचा कोण. मधल्या काळात
हिंदी सिनेमाच्या प्रथेप्रमाणे राजचे लग्न माला सिन्हाशी लहानपणीच ठरवलेले असते.
मोठा राज दारू पिणे, जुगार खेळणे वगैरे कार्यक्रमातून आपले मूळ रक्त कुणाचे
आहे ते दाखवतो. अर्थातच तो गैरसमज असतो. बाकी जाऊ द्या. ह्या भानगडीत माला बरोबर
ठरलेले लग्न मोडल्यानंतर राजच्या तोंडी 'आंसू भरी हैं, ये जीवन की राहें, कोई उनसे कहे दे, हमे भूल जाए' हे जे गाणे आहे ना त्यात राजचा अभिनय बघण्यासारखाच
आहे. पुढल्या कडव्यात तो म्हणतो,
वादे भुला दें क़सम
तोड़ दें वो, हालत पे अपनी हमें
छोड़ दें वो
उन्हें घर मुबारक
हमें अपनी आँहें, कोई उनसे कह दे ...
ह्या कडव्यानंतर सारंगी वाजवता, वाजवता राजचा जो
चेहरा आहे ना, अक्षरशः पाणी येतं डोळ्यात.
'तीसरी कसम' ह्या बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपटात राजने अप्रतीम
अभिनय केलाय. नायिका हिराबाईला बैलगाडीतून नेताना त्याने 'दुनिया बनानेवाले
क्या तेरे मनमे समाई, काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई' हे गाणे म्हणले आहे. साधी, सरळ, सोपी, सुंदर चाल असलेल्या ह्या गाण्याचे राजने सोने केले
आहे. गाण्यात पुढे तो म्हणतो,
प्रीत बनाके तूने
जीना सिखाया,
हंसना सिखाया, रोना सिखाया
जीवन के पथ पर मीत मिलाए
मीत मिलाके तूने
सपने जगाए
सपने जगाके तूने, काहे को दे दी
जुदाई
काहेको दुनिया
बनाई, तूने काहेको
दुनिया बनाई....
ह्यातील 'सपने जगाके तूने, काहे को दे दी जुदाई' ह्या ओळीला कॅमेरा
वहीदावरून फिरून राजवर येतो. दोघांचाही अभिनय वर्णनापलिकडचा आहे.
केवळ नायक म्हणून गायलेल्या गाण्यातच त्याने सुरेख
अभिनय केला आहे असे नाही, तर नंतर म्हातारपणी केवळ एका गाण्यापुरते दिसून सुद्धा
शब्दांना दिलेला न्याय बघायचा असेल 'धरम करम' मधले 'इक दिन बिक जाएगा, माटी के मोल' हे गाणे बघा. यात पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळी
म्हणताना, वयस्क आजोबा ज्या
अधिकारात हे म्हणू शकतात, तो प्रेमळ अधिकार दाखवतानाचा राजचा चेहरा बघाच. तो
सांगतो...
अनहोनी पग में काँटें लाख बिछाए, होनी तो फिर भी
बिछड़ा यार मिलाए
ये बिरहा ये दूरी, दो पल की मजबूरी, फिर कोई दिलवाला
काहे को घबराये,
धारा तो बहती है, बहके रहती है, बहती धारा बन जा, फिर दुनिया से डोल…
एखाद्या हताश झालेल्या नातवाला आजोबांनी समजवावे तसे
वाटते, नाही का...?
जाता जाता आमच्या कट्ट्यावर लावलेला एक शोध राज खरा
ठरवतो. तो असा की स्वतः दिग्दर्शित केलेल्या पेक्षा दुसर्यांनी केलेल्या
चित्रपटात राजने जास्त चांगला अभिनय केला आहे.
अखेरीस एक गाणे जे राजसाठी होते. पण त्याच्यावर
चित्रित होऊ शकले नाही. तोच का? ज्या ज्या कोणाला घेऊन हे गाणे करायचे असे राकेश
रोशनने ठरवले होते, त्यातील कोणालाही घेऊन हे गाणे होऊ शकले नाही. स्वतःचे
वडील, संगीतकार रोशन, यांच्या संगीतात, मुकेशने गायलेले, राजसाहेब अभिनीत
गाणे करायचे असे राकेश रोशनने ठरवले होते. या ना त्या कारणाने योग आला नाही. पण
योगायोग पहा. पुढे कित्येक वर्षांनी राजच्या मुलाने, ऋषी कपूरने राकेश रोशनच्या चित्रपटात गाणे गायले, जे गायले
मुकेशच्या मुलाने, नितीन मुकेशने, ज्याला संगीतबद्ध केले होते रोशनच्या मुलाने, राजेश रोशनने....
चित्रपट होता 'खुदगर्ज' व गाण्याचे बोल होते....
कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगो,
रह जाती हैं
दोस्ती
ज़िन्दगी का नाम
दोस्ती, दोस्ती का नाम ज़िन्दगी
काय लिहू अजून....???
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा