मध्यंतरी
काही काळ, मी राहातो त्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात ‘कट्ट्यावरच्या गप्पा’ नावाचे सदर लिहीत होतो. सप्टेम्बरमधे प्रकाशित झालेल्या अंकापासून मी कट्ट्यावर बसून गप्पा झोडायचे थांबवले. पण
काळाचा महिमा बघा. ज्या गप्पा मारण्याबद्दल, एके काळी मी
ज्येष्ठ मंडळींची बोलणी खाल्ली, त्याच आता मारायच्या थांबवल्याबद्दल खाल्ली. अर्थात यात सर्वांचा जिव्हाळा व प्रेमच दिसून येते. अनेकांनी
भेटून पुन्हा काहीतरी लिहायचा आग्रह केला. केवळ या एका कारणासाठी पुन्हा लिहायचे ठरवले.
सोसायटीतील किंवा फेसबुकवरील किंवा इतर वर्तुळातील, अष्टपैलू मंडळींच्या तुलनेत मी कोणीच नाही. मूळ पिंड टवाळखोरीचा असल्याकारणाने आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, व्यक्ती आणि परीस्थिती यांना हसण्यावारी नेण्यात आजपर्यंत वेळ घालवला आहे. त्यामुळे साहित्य, संगीत व कला याबाबतीत अगदीच 'विहीन'
नसलो तरी 'हीन' नक्कीच आहे. अशा परीस्थितीत पुन्हा लिहायचे तरी काय असा एक यक्षप्रश्न उभा राहिला. मधल्या
काळात ब्लॉगवर लिहीण्याचा मूड सुद्धा थोडा वेगळा होता. अनेक दिवस मनात घोळत असलेली
व्यक्तिचित्रे लिहून पूर्ण केली. त्याचेही तुम्ही सर्वांनी कौतुक केलेत. पण येऊन जाऊन प्रभुत्व असलेला विषय एकच. हिंदी
चित्रपट संगीत. त्याच त्याच गप्पा मारायला हरकत नव्हती. पण वाचणार्याचा तरी किती अंत बघायचा.
नेमके याच वेळी, एरवी गप्पा झोडण्याबद्दल टोचून आणि टाकून बोलायला आघाडीवर असणारी माझी बायको मदतीला आली….
“गाणी आणि अभिनय यावर एकत्र काही लिहू शकशील का...? एरवी काय होते की
अभिनयाबद्दल बोलताना फक्त संवादच लक्षात घेतोस. आणि गाणी म्हणालं की गायक, संगीतकार आणि फारतर गीतकार यावर बोलतोस……..”
“गुड आइडिया...
अनेक अभिनेते व
अभिनेत्री असे आहेत की
जे केवळ संवादच नव्हे तर गीते ही
उत्कृष्ट पद्धतीने अभिनीत करतात, केली आहेत.... “
“……….”
“ठीक आहे...
एक काम कर. एका वेळेला कुणा एकाच्याच अभिनय व गाण्यांबद्दल लिही...”
ह्या संवादाने मला पुन्हा एकदा विषय मिळाला. विचार करू लागल्यानंतर एक अडचण लक्षात आली. अभिनय व गाणी असे एकत्र लिहायचे म्हणल्यावर काही सुंदर गाणी आपोआप बाद झाली. कारण त्यातील कलाकार (?). उदा. बैजू बावरा. गाणी कितीही चांगली असली तरी त्या भारतभूषणचे काय करू? तसेच तो विश्वजीत, तो जॉय मुखर्जी, ती सायराबानू, ती आशा पारेख आणि कितीतरी. बरं ही नावं टाळताना एक धोक्याची जागा म्हणजे ह्या लोकांचेही फॅन्स असू शकतात.
एकदा एका प्रवासात मला एक आजोबा भेटले. मी हेडफोन लावून गाणी ऐकत होतो. जरा मला पण
द्या की ऐकायला असे म्हणून माझ्याकडून मागून घेतला. नेमके बैजूबावरा मधले गाणे
चालू होते. आजोबा खूष. मला वाटले रफीचा आवाज ऐकून खूष झाले त्यात नवल ते काय.
अचानक बोलायला लागले,
"लोकांनीना भारतभूषण वर फार अन्याय केलाय. तुम्ही समजता तितका
काही तो वाईट कलाकार नाहीये....." बरंच काय काय बोलले. इतका मोठा मानसिक
धक्का मला त्यापूर्वी व त्यानंतर कधीही बसला नाहीये. ते सगळं ऐकताना माझा चेहरा
बहुधा भारतभूषण इतकाच बापुडवाणा झाला असणार हे नक्की.
पण अनेक कलाकार असेही आहेत की ज्यांच्याबद्दल लिहायला हवेच. राज कपूर, वहीदा रहमान, नूतन, दिलीपकुमार, अमिताभ. एक एक गाणी अमर करून ठेवली आहेत. आणखीन एक गोष्ट लक्षात आली की हे सगळे करताना माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवून हे काम करावे लागणार आहे. कदाचित अतिप्रिय देव आनंदलाही बाजूला ठेवावं लागणार असं दिसतंय. ठीक आहे. काय हरकत आहे? ठेवू बाजूला ह्यावेळी...
पुढील काही दिवसात काही सुरेख गाण्यांमधे दिग्गज कलाकारांनी कसा अभिनय केला आहे व त्यामुळे ती
गाणी एका वेगळ्या उंचीवर कशी नेली आहेत, त्याबद्दल बोलूया. एक आहे की वेळ आणि जागा यांचा विचार करता या कलाकारांच्या सर्व गाण्यांचा
परामर्श घेणे शक्य नाही. त्यामुळे दोन चार गाणीच धरून बोलावे लागेल, तरी माफी असावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा