गावातली सगळी पोरं त्यांना वैमानिक आजोबा ह्याच नावानं ओळखायची.
अगदी पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं व त्यांचं हे नाव कळालं तेंव्हा आश्चर्याशिवाय कुठलीही भावना मनात आली नाही. कुठल्यातरी कार्यानिमित्त ब्राम्हण म्हणून ते जेवायला आले होते. शिडशिडीत पण अशक्त नाही अशी देहयष्टी, गोरे पान, घारे डोळे, छातीपर्यंत वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, सुमारे पावणे सहा फूट उंची, स्वच्छ धुतलेलं धोतर व बंडी असा वेष व पायात साध्या स्लीपर्स असूनसुद्धा एखाद्या सैनिकासारखी रुबाबदार चाल, अशा गोंधळात टाकणाऱ्या अवतारात ते आले.
"अनंतराव, पोटभर जेवा हं" माझ्या आजोबांनी त्यांना आदराने पाटावर बसवलं व आग्रह केला. एकही शब्द न बोलता, ते बसले व पोटभर जेवले. हात धुतल्यावर ब्राह्मण या नात्याने समोर ठेवलेली दक्षिणा उचलली व माझ्या हातावर ठेवून सरळ चालू लागले. एकंदरीतच सगळा प्रकार कळण्याच्या पलीकडे गेला होता.
गावात कुठेही फिरताना ते दिसत. कधी बाजारात, कधी पुलावर, कधी स्टॅण्डवर, कधी एखाद्या देवळात बसलेले असत तर कधी नदीकाठच्या घाटावर दिसत. कुणाशीही एक शब्द बोलताना मी त्यांना पाहिलं नव्हतं. गावातली पोरं मात्र सकाळपासून त्यांच्या मागावर असायची. रोज सकाळी नित्यनेमाने ते विष्णूच्या देवळात जायचे. हीच वेळ होती त्यांना गाठायची. कारण त्यानंतर कुठे जातील त्याचा भरवसा नव्हता. पोरं त्यांना शोधायचं कारण म्हणजे वैमानिक आजोबा गणित व इंग्रजीचे चॅम्पियन होते. ह्या दोन विषयांच्या शंका विचारायला पोरं त्यांना शोधत असायची. गणितातला कुठलाही अवघड प्रॉब्लेम, इंग्रजी व्याकरण, धड्याचा अर्थ यासाठी वैमानिक आजोबांशिवाय गावात पर्याय नव्हता. धाडधाड सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन चालायला लागायचे.
वैमानिक आजोबा व माझे आजोबा जवळपास बरोबरीचे. घरी वेदविद्यापारंगत वडील, दोन तीन भाऊ बहिणी असा परिवार होता. एकाच सुमारास माझे आजोबा आर्मीत व वैमानिक आजोबा वायुदलात दाखल झाले. विंग कमांडर होते ते. बायको, दोन मुली असा संसार होता. सगळं काही छान दृष्ट लागण्यासारखं होतं. आणि ती लागलीच.
कुठेतरी अंबाला पठाणकोटच्या बाजूला त्यांचं पोस्टिंग होतं. एक दिवस नेहमीसारखे ड्युटीवर निघाले. बायकोला सकाळपासून जरा अस्वस्थ वाटत होतं. त्यादिवशी त्यांनी सुट्टी घेऊन जरा घरी थांबावं असं बायकोला वाटत होतं. पण विनाकारण सुट्टी टाकणं ह्यांच्या सैनिकी शिस्तीत बसेना. आलोच, म्हणून कामावर गेले. दुपारी जेवायला परत आले तर सोफ्यावर बायको कायमची सोडून गेली होती. मुलींना बहिणीच्या हाती सोपवलं व नोकरीचा राजीनामा देऊन गावी परत आले. दोघं भाऊ नोकरीधंद्यानिमित्त दुसऱ्या शहरात होते. गावात आता त्यांचं कुणीच नव्हतं.
बायकोचं न ऐकल्याचं दुःख मनाशी बाळगत, शेवटपर्यंत एकटेच गावात भटकत, फिरत राहिले.
त्यांनी त्यांचा सुखी संसार गमावला होता व देशानं एक गुणी वैमानिक....
© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा