मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - वहीदा रहमान

वहीदा रहमान ही एक अतिशय सशक्त समर्थ अभिनेत्री होती, आजही आहे. यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही. गाइड मधली रोझी असो, खामोषी मधली नर्स असो किंवा तीसरी कसम मधली हीराबाई असो, वहीदाने ह्या भूमिका अमर करून ठेवल्या आहेत. एक अतिशय ग्रेसफुल पण तितकीच मर्यादाशील अशी ही अभिनेत्री. कुठल्याही चित्रपटातील कुठलीही भूमिका घ्या. वहीदाने कधीही, कुठेही चीप वागल्याचे वा दिसल्याचे आठवणार नाही. तोच डौल, तोच संयमी अभिनय, तीच १००% देण्याची वृत्ती. तीसरी कसम मधे ती हिराबाई दिसते, गाइड मधे रोझी वाटते, बीस साल बाद मधे गांव की छोरी म्हणून कुठेही कमी पडत नाही आणि देल्ही 6 मधे आजी म्हणूनही शोभते. नो वंडर, तिच्या अनेक भूमिका गाजल्या. जो अभिनय संवाद बोलताना तोच अभिनय गाताना. आणि त्यामुळेच 'तिची गाणी' आठवणे आपल्यासाठी मस्ट आहे.

पहिल्या प्रथम आठवते ते सी आय डी मधले 'कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना' हे तिचे तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील गाणे. त्याआधी तिने - तेलुगू चित्रपटात नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. पण ह्या चित्रपटात तिचा रोल दुय्यम नकारात्मक असा होता. पहिल्याच चित्रपटात नकारात्मक भूमिका करायला तिने बिलकुल मागेपुढे पाहीले नाही. गाणे जसे जसे पुढे सरकत जाते, तसतसे वहीदाचे भाव ही बदलत जातात. आधी असणारा अवखळपणा, जसजसा तो खलनायक काठी टेकत टेकत, पुढे पुढे येत जातो, तसतसा काळजी आणि तगमग यामधे बदलत जातो. त्याच्यापासून लांब असताना काळजी दिसते, पण त्याला भुलवताना मात्र पूर्ण अवखळपणा. क्या बात है... आणि शेवटी 'उड जा रे पन्छी, शिकारी है दिवाना' म्हणताना, देव आनंद भुयारात शिरतो तेंव्हा 'हुश्श' झाल्याचा अभिनय तर लाजवाब....

नंतर मला आवडते ते 'बीस साल बाद' मधले, 'जरा नजरों से कह दो जी' हे गाणे. खरं म्हणजे ह्या गाण्यातले, गायक हेमंतकुमारचे जे गद्य बोल आहेत ना, त्यांची आम्ही एकेकाळी यथेच्छ टिंगल करत असू. पण त्याच वेळी त्या गाण्यातील प्रत्येक शब्दाला साजून दिसणारी वहीदा मात्र अवश्य लक्षात राहात असे. पुढले शब्द बघा...

ये भोलापन तुम्हारा, ये शरारत और ये शोखी
ज़रूरत क्या तुम्हें तलवार की तीरों की खंजर की
नज़र भर के जिसे तुम देखो वो खुद ही मर जाए

शकील बदायुनी यांच्या शब्दांनी पुरेपूर न्याय दिलाय वहीदाला.

बरं ह्या गाण्यात टिपिकल 'गांव की छोरी' टाईपची भूमिका होती, तर गाइड मधे एकदम मॉडर्न रोझीची. वयाने बर्यापैकी मोठ्या आणि सदैव कामात मग्न असणार्या नवर्यामुळे कुढणारी नंतर राजू गाइड च्या सहवासात खुललेली रोझी, वहीदाने फार मस्त साकारलीय. 'आज फिर जीने की तमन्ना है' ह्या गाण्यात तर ती अक्षरशः 'सुटलीय'.

मैं हूँ गुबार या तूफ़ां हूँ, कोई बताए मैं कहाँ हूँ,
डर है सफ़र में कहीं खो जाऊँ मैं, रस्ता नया..
ह्या ओळी म्हणतानाचा तिचा अभिनय आणि नृत्य अवश्य बघण्यासारखे आहे.

वहीदाच्या कारकीर्दीतील एक लॅंडमार्क म्हणता येईल अशी भूमिका म्हणजे 'तीसरी कसम' मधली 'हिराबाई' ची. हिराबाई ही एक तवायफ (गानेवाली बाई) असते. राज कपूरनी ह्या चित्रपटाची स्टोरी ऐकताच, मीच नायकाची, म्हणजे हिरामणची, भूमिका करणार, असे जाहीर करून टाकले. राज सारख्या बड्या प्रस्थाच्या हट्टापुढे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य काही करू शकले नाहीत. बापाच्या वयाच्या दिसणार्या नायकाबरोबर वहीदाला काम करावे लागले. अतिशय भावपूर्ण कथा, सुरेख दिग्दर्शन, राज वहीदाचा अप्रतीम अभिनय, एव्हढे सगळे असूनही चित्रपट पडला. शेवटच्या सीन मधे हिरामण धावत धावत तिला शोधत येतो. चल, आपण पळून जाऊन लग्न करू म्हणतो. त्यावेळी हिराबाई एव्हढेच म्हणते, "मैं बिक चुकी हूँ, मितवा". ह्या वाक्याला वहीदाचा आणि वाक्य ऐकल्यावर राजचा अभिनय एकदा बघाच. हेलावून टाकणारा अभिनय. मात्र चित्रपट पडूनसुद्धा त्यातली गाणी आजही ऐकली जातात. ‘पान खाए सैया हमारोह्या गाण्यावर केलेला तिचा एका सराईत गाणारणीचा अभिनय बघा. आणि त्याच गाणारणीचा ' आभी जा, रात ढलने लगी, चांद छुपने चला' असे एका वेगळ्या परिस्थितीत म्हणतानाचा अभिनय पहा. लाजवाब. दुसरा शब्द नाही.

विनवणी, काळजी, लटका राग, अनुराग, प्रीती या अनेक भावनांचे मिश्रण म्हणजे 'मुझे जीने दो' मधले नदी नारे ना जाओ शाम पैया पडू. काय सुरेख भावामुद्रा आहेत वहिदाच्या. गाण्याच्या सुरुवातीला ती विनवते की नदीत जाऊ नको, पुढे म्हणते की जायचे तर जा पण प्रवाहात जाऊ नको. असे करत करत शेवटी निदान सवत तरी आणू नकोस आणि आणलीस तर निदान मला भेटवू नकोस.
उस पारे जो जाओ तो जैबे करो
संग सवतिया लाओ शाम पैयाँ पड़ूँ

संग सवतिया जो लाओ तो जैबे करो
हमसे मिलाओ, शाम, पैयाँ पड़ूँ

ह्या शेवटच्या दोन कडव्यांमधे जे काही भावविभ्रम वहिदाने सादर केलेत ना, ते यूट्यूब वर नक्की बघा. थक्क व्हाल.

अशीच एक तिची माइलस्टोन भूमिका म्हणजे खामोशीमधली नर्सची. नायिका असूनसुद्धा ह्या चित्रपटात वहीदाला एकही गाणे नाही. तीन प्रसिद्ध गाणी. एक राजेशचे, दुसरे धर्मेन्द्रचे, तिसरे तिच्या मैत्रिणीचे. पण तीनही गाण्यांच्यावेळचा वहीदाचा अभिनय मात्र केवळ सुरेख. एका सायकीआट्रिक उपचार करणारया हॉस्पिटल मधली ही नर्स, नर्सिंग करता करता पेशंट च्याच प्रेमात पडते. दोन्ही वेळेला अपयश. त्याच्या स्ट्रेसमुळे अखेर तिलाच एडमिट करावे लागते. वहीदाचा एक सूपर हिट चित्रपटअरूण (राजेश खन्ना) एक कवी, लेखक. मनस्वी अशा या अरूणचा ब्रेक अप झाल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. त्याआधी देवकुमार (धर्मेन्द्र) वर उपचार करताना हिचाही ब्रेक अप झालेला असतो. अशा पार्श्वभूमीवर अरूण गातो.

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है

राजेशचा अभिनय तर मस्तच, पण वहीदाचा अतिसुन्दर.

'कभी कभी' मधे वहीदाने अमिताभच्या पत्नीची (अंजली) भूमिका केली आहे. अंजलीला लग्नाआधीच्या प्रेमप्रकरणातून एक मुलगी (नीतू सिंग) असते, जिला पुढे कपूर दांपत्याने (परीक्षित सहानी, सिमी गॅरेवाल) दत्तक घेतलेले असते. योगायोगाने ती अंजलीच्या संपर्कात येते, जिथे अंजलीला कळते की ही आपलीच. अशा परिस्थितीत ती घरी आलेली असताना, अंजली गाते...

मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी
चांदनी के हसीन रथ पे सवार

ह्याच गाण्यात जे शेवटचे कडवे आहे ना, त्या कडव्याचे शब्द वर दिलेल्या बॅकग्राउंड वर पहा. मग कळेल वहीदा म्हणजे काय रसायन होते.

मैने पूछा उसे के कौन है तू, हंसके बोली के मैं हूँ तेरा प्यार
मैं तेरे दिल में थी हमेशा से, घर में आई हूँ आज पहली बार

साहीरच्या शब्दांवर, लताच्या आवाजात, वहीदाचा परफॉर्मन्स एकदा बघाच.

नायिकेच्या भूमिका मिळेनाशा झाल्यानंतर, वहीदा चरीत्र भूमिका करू लागली, आज ही करतेय. ज्या अमिताभची १९७६ मधे (कभी कभी) ती पत्नी होती, त्याच अमिताभची १९७८ मधे (त्रिशूल) ती आई झाली. वागण्यामधली अभिनयामधली ग्रेस मात्र तीच, तशीच राहीली. १९८४ च्या 'मशाल' मधे दिलीपकुमारच्या पत्नीची (सुधा) छोटीशीच, पण सुरेख भूमिका तिने केली. पण आता तिच्या वाट्याला गाणी मात्र येत नव्हती.

अचानक २००९ मधे 'देल्ही 6' मधे अभिषेक बच्चनच्या आजीच्या भूमिकेत ती परत गाताना दिसली. गाणे होते...

सैया छेड देवे, ननद चुटकी लेवे,
ससुराल गेन्दा फूल,
सास गारी देवे, देवर समझा लेवे,
ससुराल गेन्दा फूल,

गाण्यात तसे काहीही खास नाही. पण आजूबाजूला अनेक सुंदर तरुणी असताना देखील, आपले लक्ष खिळून राहते ते फक्त वहीदाकडे.

ह्या गाण्याच्या निमित्ताने जाता जाता वहीदाने एक लाइफ टाइम धडा दिलाय. तो म्हणजे....

म्हातारपणसुद्धा अतिशय ग्रेसफुल असू शकतं...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस