मुख्य सामग्रीवर वगळा

पणजोबांचं घड्याळ


शाळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आजोळी जमत असू. दिवसभर दंगा, खेळ, नदीवर पोहायला जाणे, संध्याकाळी शेतात जाणे असा भरगच्च कार्यक्रम असे. मात्र दुपारच्या वेळी आमची आजी कुठेही जाऊ देत नसे. मग आमची तिच्यामागे भुणभुण सुरू होई, आजी, मी काय करू? बोअर झालंय. .. मग आम्हाला गुंतवून ठेवायला कधी कधी ती माळा आवरायची टूम काढत असे. आमचे आजोळघर जुन्या काळचे भलेमोठे घर होते. त्यामुळे त्याचा माळा सुद्धा मोठा होता. आजी म्हणत असे, 'चला, सगळे मिळून माळ्यावरचे भंगार काढू या'. आम्ही सगळे उत्साहाने कामाला लागत असू. एक एक गाठोडे, एक एक पेटी, उघडली जात असे. काय काय सापडायचे? खरं तर काय काय नाही सापडायचे?

जुने फोटोंचे आल्बम, मामाचे यत्ता चौथीचे प्रगती पुस्तक, आजोबांच्या आर्मीमधल्या वस्तू, ताईमावशीच्या, आईच्या, कसल्या कसल्या कलाकृती, यत्ता नववीचे मराठीचे पुस्तक, आजीच्या जुन्या विणकामाच्या सुया, पणजोबांचे अतिशय चांगल्या स्थितीतले पण बंद पडलेले, 'फावर लुबा' चे घड्याळ. एक ना दोन. आजी स्वतः आमच्याबरोबर कामाला लागे. एक एक वस्तू काढली की त्याची आठवण सुरू होई 'हे राहू दे, नको टाकू', ह्या वाक्याने शेवट होत असे. तीन चार तासांनंतर दोन पाच किडूकमिडूक गोष्टी वगळता बाकी सर्व चीजवस्तू माळ्यावर होती तिथे परत जात असे.

काहीशी अशीच परिस्थिती मध्यंतरी माझ्यावर आली होती. काही कारणानी महिनाभर घरी होतो. हिंडणे फिरणे शक्य नव्हते. घरी बसून बसून कंटाळा येऊ लागला होता. मग ठरवलं की जरा लॅपटॉपची साफसफाई करावी. दुनियाभरचा डेटा जमा झाला आहे. नको असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या. का कोणजाणे, हा विचार मोठ्याने बोलून दाखवायची दुर्बुद्धी मला झाली आणि क्षणार्धात किचनमधून 'वार' झाला, 'पहिली ती सतराशे साठ गाणी काढ'. ठीक आहे. बघूया तरी कोणकोणती गाणी काढायला हवी आहेत....? उगाच डावेउजवे होऊ नये म्हणून सर्व गाणी alphabetically लावून घेतली. हो. पुन्हा भानगड नको. तलत डिलीट केलास? रफी का नको? नकोच ते. ओळीने बघत जावे हे बरे.

पहिले गाणे पुढे आले ' लौट के आजा मेरे मीत'. मुकेशचे. मुकेशच्या गायकीला खूप मर्यादा होत्या. पण तरी सुद्धा त्याचा तो सानुनासिक आवाज जादूभरा होता. फार वरच्या पट्टीत आवाज चढवावा लागला तर त्याचा आवाज फाटत असे. आता ह्याच गाण्यात 'मेरा सूना पडा रे संगीत' मधल्या 'पडा'वर त्याचा आवाज थोडासा फाटलाय. पण तरी कानाला गोड लागतो. केवळ ह्या 'पडा' साठी हे गाणे मी माझ्या संग्रहात घेतले होतेजाऊ दे. नको डिलीट करायला......

पाठोपाठ होते ' अब लौट चले' (जिस देश में गंगा बहती है). मुकेशच्याच आवाजातले एक सुंदर गाणे. पण मी ते घेतले होते ते त्या गाण्यात मधे मधे असणार्या लताच्या 'आजा रेsssss' अशा आर्त तानेसाठी. त्या एका तानेतून लताने काय काय दाखवले आहे? पुढे असलेला धोका, दगाफटका व्हायचा संभव, राजूचा जीव कसा वाचवू ही आर्तता, सगळे सगळे त्या एका 'आजा रेsss' मधे आले आहेशक्य आहे हे गाणे डिलीट करणे? No way…..

पुढे आले १९७४च्या 'मनोरंजन' मधले 'आया हूँ मैं तुझको ले जाऊंगा अपने साथ तेरा हात थामके'. संगीत आर डी बर्मन, गायक किशोर आणि आशा. तसे काही खास गाणे आहे असे नाही. पण कधी फास्ट तर कधी स्लो अशा लयीत गायलेले हे गाणे जर सहज गुणगुणायला गेलात ना तर हमखास चाल तरी चुकेल किंवा लयीत मार बसतोएक 'हट के' गाणे आहे. राहू दे….

नंतर आले १९५९ च्या 'नवरंग' मधले 'अरे जा रे हट नटखट'. संगीत सी रामचंद्र, गायले आहे लता आणि महेन्द्र कपूर यांनी. ह्या गाण्यावर संध्याबाईंनी जे नृत्य केले आहे त्याला तोड नाही. एका बाजूने स्त्री, एका बाजूने पुरूष. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनालाही तोड नाही. गाण्याच्या शूटिंग नंतर दोन महिने संध्याबाई आजारी पडल्या होत्या. वाद्यान्चा कल्लोळ असलेले हे पहिले गाणे. दुसरे १९६७ च्या 'ज्युवेल थीफ' मधले अर्थातच 'होटो में ऐसी बात'. १९६७ पासून आजपर्यंत एकही गणेशोत्सव ह्या गाण्याविना झाला नसेल. पण त्याचवेळी जा रे हट नटखट मात्र  डेकोरेशनचे दिवे नाचवायला वापरत नाहीतलोक विसरले असतील. मी का विसरावे? असू दे....

यादीत पुढे एक सापडले १९५९ च्या 'अनाडी' मधले 'बन के पन्छी गाए प्यार का तराना'. गाण्यात तसे विशेष काही नाही. मला आवडतो तो मधूनच पेरलेला सायकलच्या घन्टेचा आवाज आणि एका विशिष्ट उंच, किरट्या आवाजात गाणारा कोरस. हा असला कोरस त्याकाळी बर्याच गाण्यात असे. १९५५ च्या 'उडन खटोला' मधल्या 'मेरा सलाम ले जा' ह्या गाण्यात किंवा १९६० च्या 'दिल अपना और प्रीत पराई' मधल्या 'अजीब दास्तान है ये' मधे पण हा असला कोरस आहे. ह्या आवाजात गाणार्या बायका आता कुठे गेल्या? हल्ली काही हा आवाज ऐकायला मिळत नाहीअसू दे....

वाद्यान्चा कल्लोळ संपेपर्यंत पुढे आले १९६६ च्या 'ममता' मधले 'छुपा लो यू दिल में प्यार मेरा'. वाद्यच नाहीत. ठेक्याला एक फक्त व्हायब्रोफोन आणि interlude साठी सारंगी. बस्स. संगीतकार रोशनची कमाल आहे. आणि या गाण्यापाठोपाठ आठवते ते त्याच वर्षी आलेल्या 'अनुपमा' मधले 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं'. असाच फक्त एक व्हायब्रोफोन आणि थोडीशी व्हायोलिन्स. खलास. ही कमाल होती संगीतकार हेमंतकुमारची. त्यात पुन्हा एक छोटेसे साम्य असे की दोन्ही गाण्यांमधे हेमंतकुमार आहे. दोन्ही गाणी ठेवून दिली. का डिलीट करायची?

एक अतिशय जुने गाणे समोर आले. माझ्या माहितीतल्या बहुतेक लोकांना हे गाणे माहीत नसते. १९४५ च्या दत्ता कोरगावकर (के दत्ता) यांनी संगीत दिलेल्या 'बडी मां' या चित्रपटातील हे गाणे आहे. शब्द आहेत 'दिया जलाकर आप बुझाया'. गायिका नूरे तरन्नुम नूरजहान. साधी, सोपी चाल आहे. पण त्याकाळी ह्या गाण्याने संपूर्ण देश वेडा झाला होता. विशेषतः जलाकर आणि आप या शब्दांवर नूरजहानचा जो आवाज लागला आहे ना, तो ऐकत राहावे वाटते.

ह्या गाण्यामुळेच एक १६-१७ वर्षांचा तरूण भारावून गेला. त्याने ठरवले की आपण पण मुंबईला जाऊन संगीतकार व्हायचे. तो आला. आणि खरोखरच महान संगीतकार झाला. पहिल्या हिट चित्रपटानंतर के दत्तान्च्या घरी गेला गुरुदक्षिणा म्हणून त्या काळातील सगळ्यात महाग हार्मोनीयम त्यांना देऊन आला. त्याचे नाव होते ओपी नय्यर…..

स्क्रोल करता करता दिसले 'दोस्ती' (१९६४) मधले रफीने गायलेले 'राही मनवा दुख की चिंता'. गाणे खूपच छान आहे. खुद्द रफीच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. पण मला स्वतःला विशेष आवडते ती तिसर्या कडव्याच्या आधी माऊथ ऑर्गन वर वाजवलेली ट्यून. माऊथ ऑर्गन म्हणल्यावर खरं तर पटकन आठवते ते 'सोलवा साल' मधले 'है अपना दिल तो आवारा, जाने किस पे आयेगा'. पण तिथे प्रत्येक कडव्यानंतर तीच ट्यून परत परत वाजवली आहे. मला जास्त आवडते ती 'राही मनवा'ची ट्यून.

कुठल्याही गाण्याच्या गोडव्यात ह्या अशा प्रकारच्या पार्श्वसंगीताचा मोठा वाटा असतो. पण फार क्वचित आपण तो लक्षात घेतो. सांगायचेच झाले तर १९७७च्या 'स्वामी' मधले 'पलभर में ये क्या हो गया' हे गाणे. प्रत्येक कडव्याच्या मधे ४०-५० व्हायोलिन्सनी जी काय एक interlude' वाजवली आहे ना, ती त्या गाण्याला एक वेगळीच गोडी देते. तसाच काहीसा प्रकार होतो 'मेरे हमसफर' (१९७०) मधल्या किसी राह में, किसी मोड़ पर कही चल ना देना तू छोड़कर, मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र ह्या गाण्याच्या बाबतीत. अशीच ४०-५० व्हायोलिन्सनी मजा आणलीय.
ह्या गाण्यात एके ठिकाणी रेल्वेच्या शिट्टीचा आणि इंजिनाचा आवाज पण आहे. गाण्यात पडद्यावर ती ट्रेन जात असताना जितेन्द्रने जे इनोसेंट भाव दाखवले आहेत ना, ते जरूर बघण्यासारखे आहेत. आता रेल्वे आणि शिट्टी म्हणल्यावर 'पाकिजा' मधल्या 'चलते चलते' ह्या गाण्याच्या शेवटास असलेली इंजिनाची शिट्टी कशी विसरता येईल?

त्याकाळातले लोक फारच समंजस आणि मोठया मनाचे होते. आपले एखादे गाणे रेकॉर्ड होत असताना दुसरा एखादा संगीतकार तिथे आला तर रेकॉर्डिंग करणार्याला त्यात काहीही वावगे वाटत नसे. १९५० च्या 'बावरे नैन' च्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. संगीतकार होते रोशन आणि गायिका होती जुन्या काळची प्रसिद्ध गायिका राजकुमारी. चाल अतिशय सुमधुर होती, पण सारखे वाटत होते की काहीतरी कमी पडतंय. योगायोगाने संगीतकार नौशाद तिथे आले. सगळे पाहिल्यावर त्यांनी गाण्यामधला फक्त एक शब्द बदलला. जादू झाल्यासारखे ते गाणे पूर्ण झाले. गाण्याचे शब्द होते, 'सुन बैरी बलम सच बोल रे, इब क्या होगा'. आधी इबच्या जागी अब असा शब्द होता. नौशादनी तेव्हढा एक शब्द बदलला. अर्थ तोच, पण impact पूर्णपणे वेगळा. शंका असेल तर आजही इबच्या जागी अब असे म्हणून बघा. चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

साधारण वीस एक वर्षांपूर्वी नव्वदीच्या राजकुमारी, हिंदी 'सा रे ' च्या कार्यक्रमात आल्या होत्या. सूत्रधार सोनू निगमच्या आग्रहावरून थरथरत्या आवाजात त्यांनी म्हणलेले हे गाणे आजही माझ्या कानात आहे.

ह्या गाण्याच्या नंतर लगेच होते माझ्या वैयक्तिक 'टॉप टेन' मधले, १९६१च्या 'छाया' चित्रपटातले 'इतना ना मुझसे तू प्यार बढा...' संगीतकार सलील चौधरी. गीतकार राजेंद्र कृष्ण. गायक आहेत लता आणि तलत. सलील चौधरींसारखा महान संगीतकार, पण एका क्षणी जागतिक कीर्तीच्या, पाश्चात्य संगीतकार मोझार्टच्या 'सिंफनी 40' मुळे भारावला आणि तशीच्या तशी ती चाल ह्या गाण्याकरता वापरली, पण कुठेही भारतीय कानाला विचित्र लागणार नाही याची काळजी घेऊनच. गाण्याचे दुसरे कडवे तर मला अतिशय आवडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री कशी असते त्याचे सुरेख प्रतिबिंब ह्या शब्दात आहे....
नील गगन के दीवाने, तू प्यार ना मेरा पहचाने
मैं तब तक साथ चलू तेरे, जब तक ना कहे तू मैं हारा….


१९७२च्या 'परिचय' मधले भूपेन्द्रसिंगने गायलेले, थोडेसे अपरिचित, पण अतिशय सुश्राव्य गाणे आहे, 'मितवा, बोले मीठे बैन'. पडद्यावर संजीवकुमार गातो तेंव्हा असे वाटतच नाही की कुणा दुसर्याच्या आवाजात तो गातोय, इतका सुरेख अभिनय. डिलीट करणे? नामुमकिन....


असेच एक अपरिचित गाणे सापडले १९५५च्या 'मुनिमजी' मधले, ' शिवजी बिहाने चले'. ह्या गाण्यात भूतगणान्च्या वाद्यान्चा एक अत्यंत बेसुरा कलकलाट आहे. पण गाण्यामधे ऐकताना कुठेही त्रासदायक होत नाही. सर्व श्रेय संगीतकार एस डी बर्मन यांचे. साधारणपणे वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी विविधभारतीवर ऐकायला मिळते. पण एरवी ऐकावेसे वाटले तर असूदे म्हणून ठेवून दिले.


मग सापडले १९६३चे 'ये दिल किसको दू' मधले 'फिर आने लगा याद वही प्यार का आलम'. रागिणी काय बेफाम नाचलीय. आणि शिवाय प्रत्येक ध्रुपदाच्या वेळी शशी कपूर रागिणीने जोडीने पाय उचलून पुढे टाकायची action. सगळेच भन्नाट. कधीमधी ऐकायला फार मजा येते.


मधेच दिसले 'सीआयडी' मधले 'आँखो ही आँखो में इशारा हो गया'. एकदम फेमस गाणे. गाण्याचे वैशिष्ट्य असे की ह्या गाण्याचा फक्त मुखडा रफीने गायलाय आणि सर्व अंतरे गीता दत्तने. एक अभिनव प्रयोग. त्यावरून आठवले १९९०च्या 'सैलाब' मधले माधुरी दिक्षितचे 'हम को आजकल है इंतजार' हे गाणे. ह्या गाण्यात फक्त मुखडा गायिका अनुपमा देशपांडेने (कोण ही...??) गायलाय सर्व अंतरे कोरसने गायले आहेत. हे गाणे मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंग मधले आहे. कोणी सांगेल का हे मेडिकल कॉलेज भारतात कुठे आहे, जिथे ह्या असल्या पोरी डॉक्टर व्हायला येतात?


नंतर दिसले 'कोतवालसाब' (१९७७) मधले 'साथी रे भूल ना जाना मेरा प्यार'. संगीतकार रवींद्र जैन यांची एक अत्यंत अवघड अशी चाल आहे, जी कदाचित फक्त आशाताईच गाऊ शकतात. प्रयत्न करून बघा. नक्की चुकायला होईल. एक मात्र आहे. गाणे ऐकताना किमान चार वेळा 'जिवलगा, राहीले रे दूर घर माझे' हे गाणे आठवतेच. का कुणास ठाऊक?

एकेका गाण्याचा review करता करता पार Z पर्यंत पोचलो होतो. तिथे सापडले 'सत्ते पे सत्ता' (१९८२) मधले 'जिंदगी मिल के बितायेन्गे' हे गाणे. आरडीने चाल चोरलेली आहे. पण जिथे अख्खा पिक्चर मूळ इंग्रजी 'Seven Brides for Seven Brothers' ह्या पिक्चरवरून चोरलाय तिथे एका गाण्याचे काय? पण मग मी कशाला जपून ठेवतोय? कर ना डिलीट....

नाही करणार. कारण हे गाणे ज्यावरून बनवले आहे ती मूळ ट्यून आहे, दुसर्या महायुद्धावर आधारलेल्या १९६२च्या 'The Longest Day' ह्या इंग्रजी चित्रपटातील थीम ट्यून. आणि हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे.


लॅपटॉपरूपी माळ्यावरचा हा so called कचरा बघता बघता - तास कसे गेले कळलेच नाहीत. लहानपणीसुद्धा, ना आम्हाला कळत असे, ना आमच्या आजीला. तिच्यासारखेच दोन चार फुटकळ नग फेकण्यासाठी म्हणून बाजूला काढले, बाकीचे पुन्हा होते तसे ठेवून दिले. तेंव्हा आम्हाला कायम हा प्रश्न पडत असे की आजीचे हे असे का होते? पण आज माझी स्वतःची तीच अवस्था झाली आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले....

कितीही जुनं झालं ना तरी पणजोबांचं घड्याळ कधी 'भंगार' नाही हो होत.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत