मुख्य सामग्रीवर वगळा

पहिली वात

नमस्कार.

माझ्या ह्या ब्लॉगचे नाव वाचून आश्चर्य वाटले का? साहजिक आहे कारण बर्‍याच लोकांना चमनचिडी हा प्रकार माहीत नसेल. हा दिवाळीत उडवण्याचा एक फटाका होता. एक पत्र्याची डबी, त्यात काळी दारू भरलेली, एक छोटीशी वात. पेटवल्या नंतर झुईई करत कुठल्याही रॅंडम दिशेला ही उडून जात असे. ही उडवल्या नंतर होणारी बघ्यांची पळापळ, हा एक वेगळा मनोरंजनाचा प्रकार घडत असे. काही छोटे अपघात पण होत. अखेर सरकारने यावर बंदी आणली.

तर अशा या बंदी घातलेल्या पदार्थाचे नाव ब्लॉगला देण्यामागचा हेतू केवळ त्याच्या दिशाहीन उडण्याशी साम्य असण्यापुरता.

ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते....

आता पटले ना, चमनचिडी नाव का ठेवले?

जेंव्हा जमेल, जसे जमेल, तशी उडवत जाईन. मनोरंजन होईल, कदाचित काही विचार करायला प्रवृत्त करेल, पण अपघात नक्कीच होणार नाहीत.

भेटूया मग असेच.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...