मुख्य सामग्रीवर वगळा

भिकारी

तो आणि ती....

असतील तिशीचे....

दोघेही उच्चशिक्षित. मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाला. तरुण वयातच सर्व काही मिळवलेलं....

खरं तर फक्त पैसा मिळवलेला, बाकी खूप काही गमावलेलं, हरवलेलं....

आज अनेक दिवसांनी दोघेही एकत्र बाहेर पडले होते. याआधी कधी असे बाहेर गेलो होतो? दोघांनाही आठवत नव्हतं. सुरेखसे perfumes मारून दोघे निघाले होते. तिच्या हातात मागच्याच वर्षी पॅरीसला घेतलेली महागडी पर्स. आधी एखादा नवीन picture व नंतर एखाद्या रुफटॉप restaurant मध्ये जेवण, असा बेत ठरला होता.  हलक्या आवाजात किशोर व आशाची duets लावून तो मधूनच शीळ घालत होता. ती त्याच्याकडे बघत होती. दोघेही मूडमधे होते.

एका सिग्नलला गाडी थांबली. काचेवर टकटक झाली म्हणून तिने बाहेर पाहीलं. एक साधारण आठ दहा वर्षांचं पोरगं गजरे हवेत का विचारत होतं.

घेऊ का रे....

घे की. त्यात काय विचारायचंय.... ?

कसे दिलेस रे? तिने काच खाली करून पोराला विचारलं.

मॅडम, दहाला एक, वीसला तीन... घ्या ना तीन, ताजे आहेत...

एव्हढे नकोत. पंधराला दोन दे.

घ्या.  त्याने पटकन दोन गजरे काढून तिच्या हातात दिले. तिने पर्समधून वीसची नोट काढून त्याला दिली.

थांबा हं मॅडम, सुट्टे आणून देतो, असे म्हणून क्षणात ते पोरगं पळत सुटलं. ती अरे, अरे म्हणे पर्यंत दिसेनासं झालं. तो आरशातून मागे बघायचा प्रयत्न करेपर्यंत सिग्नल हिरवा झाला व त्यांना निघावंच लागलं.

हे असले सगळे भिकारी असेच... तो वैतागला.

ह्या सगळ्यांना बोटीत घालून एखाद्या island वर सोडायला पाहीजे....  तिने उपाय सुचवला.

ह्या लोकांचा हा प्लॅनच असतो. आणून देतो सांगून गायब व्हायचं. हे सगळे भिकारी म्हणजे आपल्या देशाचा एक big time problem आहे...

यू.एस. मधे....

दोघेही काही वेळ असेच वैतागत व काहीबाही बोलत राहीले. लाखो रुपये कमावणाऱ्या दोघांचा जीव, त्या पाच रुपयात अडकला होता.

तोपर्यंत पुढचा सिग्नल आला. काचेवर टकटक झाली. तेच गजरेवालं पोरगं होतं. तिने काच खाली करताच त्यानं पटकन पाचची नोट तिच्या मांडीवर टाकली व 'मॅडम, तुमचं पैसं' असं म्हणत, दुसरी गाडी अंगावर यायच्या आत उडी मारून बाजूला झालं.

अरे, अरे, राहूदे तुला....

नगं. बानं सांगितलंय कोनाचंबी पैसं ठिवायचं न्हाई. असलं पैसं पुरत न्हाई...  असं म्हणून ते पोरगं दिसेनासं झालं.

दोघांनाही काही वेळापूर्वी तोडलेले तारे आठवले. राहून राहून त्या पोराचे शब्द त्यांच्या कानात वाजत होते.

असलं पैसं पुरत न्हाई... असलं पैसं पुरत न्हाई...

मांडीवरची नोट एकच विचारत होती....

सांगा आता, भिकारी कोण.....?







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...