मुख्य सामग्रीवर वगळा

बिनडोक आंदोलने

व्यथित....

माझ्या आत्ताच्या मनःस्थितीला दुसरा शब्द नाही. आणि माझ्यासारखाच प्रत्येक सामान्य मनुष्य असाच व्यथित झालेला असणार आहे. अरे चाललंय काय? लाखो लिटर दूध सरळ ओतून देताय? दुधाला योग्य तो भाव मिळत नाहीये, हे कारण आम्हाला माहीत आहे आणि मान्य पण आहे. योग्य भाव मिळालाच पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी पत्करलेला मार्ग सर्वस्वी अयोग्य व अन्यायकारक आहे.

दूधच का? हल्ली प्रत्येक पीक रस्त्यावर टाकून नाश करायचा व आम्ही आंदोलन करतोय असे म्हणायचे, ही एक फॅशन झालीय. मागे टोमॅटो टाकले, त्याआधी कांदे झाले, कोथिंबीर झाली. आज वळून पाहिले तर नक्की कोणाचा फायदा झाला हे लगेच लक्षात येईल. शेतकऱ्याचा नक्कीच झालेला नाहीये.

प्रत्येक वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला तरी वेठीला धरायचे व काम संपल्यावर अलगद कल्टी मारायची. आंदोलन करणाऱ्यांपैकी नक्की किती जण स्वतः पोळलेले असतात हे पाहिले तर लक्षात येते की केवळ गुंडापुंडांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांचा व गवळ्यांचा माल हिसकावून घेऊन तो रस्त्यात टाकला गेलाय. कमी तर कमी, दोन पैसे मिळाले असते, ते ही गेले.

आंदोलनामुळे साद्ध्य काय झाले? काही नाही. हजारो, लाखो लोक ज्यांचा ह्या भाव ठरवण्याशी काही संबंध नाही, असे लोक निष्कारण भरडले गेले. कितीतरी कच्चीबच्ची असतील, कितीतरी आजारी, वृद्ध असतील, कितीतरी खेळाडू असतील, ज्यांना आज गरज असून दूध मिळालं नसेल. रस्त्यावर ओतून देण्यापेक्षा त्या मेळघाटातल्या, हेमलकासातल्या कुपोषित मुलांना वाटले असतेत ना, शेतकरीच काय, सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता.

बरं. आंदोलनाचे कारण काय तर शासनाचे डोळे उघडावेत म्हणून. मला एक सांगा, प्रत्येक गोष्टीला शासन जबाबदार? प्रत्येक गोष्ट शासनाने करावी. अरे पण मग तुम्ही काय करणार? मुख्य कारणं राहिली बाजूला. सगळ्यात मोठे कारण आहे मधले दलाल. पण त्यांना हात नाही लावणार. कारण एक तर स्वतःचाच तो व्यवसाय आहे किंवा असे दलालच ह्यांचे पोशिंदे आहेत.

ज्यांना मनापासून ह्या गोष्टीची जाणीव आहे ना, ते कुणासाठीही न थांबता योग्य ते काम करत आहेत. अगदी कॉर्पोरेट, व्यावसायिक पद्धतीने करत आहेत. श्रीरामपूरचं 'प्रभात' आहे, भिलवडीचे 'चितळे' आहेत. वर्षानुवर्षे शेतकरी ह्यांना दूध विकताहेत. पण कुणाचीही तक्रार नाहीये. ह्या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या अनेक सोयी केल्यात, त्यांना मदत केली आहे. त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या पद्धतीने, शासनाकडे न बघता. ह्यांना दूध विकून लोकांनी संसार उभे केलेत.

असं काही विधायक  करण्याऐवजी, अत्यंत बिनडोक पद्धतीने, विध्वंसक वागणं चालू आहे. तुम्ही, मी, आपण सामान्य लोक, एकएकटे काही करू शकत नाही. पण हे कशासाठी चालू आहे ते आपणा सर्वांना नक्कीच कळतंय.  योग्य वेळी, योग्य पद्धतीने आपण ह्या झुंडांना, पुंडांना व गुंडांना धडा नक्कीच शिकवू शकतो. ती वेळ आलेली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...