मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींचा दरवळ

काल संध्याकाळी ऑफिस मधून घरी येताना रस्त्याच्या एका कोपऱ्यावर गाडीवाल्याने माझ्यासमोर वड्यांचा घाणा कढईत सोडला व त्या स्वर्गीय वासाने सारा आसमंत दरवळून गेला. हा वास माझ्या खूप लहानपणापासून परिचयाचा आहे. लहानपणी गावात रहात असताना आईबरोबर मंडईत गेल्यावर हा वास अवश्य येत असे. पण त्याकाळी बाहेरचे खाणे हे बऱ्यापैकी निषिध्द असल्यामुळे त्या वासाशी निगडीत असलेला स्वाद चाखायला मिळाला नव्हता.  बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधे गेल्यानंतर त्या स्वादाशीही संबंध  आला.  इतका आला की नंतर नंतर नुसत्या वासावरून, सोडलेला घाणा हा भज्यांचा आहे का वड्यांचा, हेही ओळखता येऊ लागले. पण आजही तो वास आला की मला लहानपणी आईचे बोट धरून मंडईत गेल्याची आठवण येतेच.

कुठल्या गोष्टीमुळे मन भूतकाळात खेचले जाईल त्याचा नेम नाही. एखादी वस्तू, व्यक्ती, गाणं, आवाज आणि अर्थातच वास. हे सगळे कधी ना कधीतरी घडलेल्या घटनांचे, प्रसंगांचे भागीदार, साक्षीदार असतात. आयुष्याच्या पुढल्या टप्प्यांवर अचानक भेटतात व आपल्याला पुन्हा मागे ओढून नेतात.

मला काही वेळा तर असे वाटते की ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अशा काही वासांशी जुळलेल्या आठवणी असणार. उगाच नाही त्यांनी 'अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू' म्हणलंय.

आपल्या सर्वांच्या लहानपणाशी जुळलेला एक कॉमन वास म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होतानाच्या दिवसात येणारा नव्याकोऱ्या वह्यापुस्तकांचा वास. मलाच काय, प्रत्येकालाच तो विशिष्ट खळीचा वास, शालेय दिवसात ओढून नेतो.

असाच एका विशिष्ट उदबत्तीचा वास मला आजोळी घेऊन जातो. माझ्या आजोबांना पूजेसाठी तीच उदबत्ती लागायची. आमचे आजोबा सकाळी स्नानानंतर बराच वेळ पूजा करीत. त्यांची पूजा होऊन नैवेद्य दाखवल्याशिवाय आजी जेवायला वाढत नसे. आम्हा सगळ्यांना सकाळपासून खेळल्यामुळे भूक लागलेली असायची. त्यामुळे आमचे लक्ष ह्या वासाकडे असायचे. उदबत्तीचा तो वास आला की आम्ही ओळखायचो की आता लगेच नैवेद्य आणि पुढे पाच मिनिटात जेवायला वाढणार. आजही त्या उदबत्तीच्या वासाने मी मे महिन्यातल्या, आजोळच्या गावातल्या, साडेबारा पाऊणच्या माहौल मधे जातो.

थंडीच्या दिवसात, शनिवारी सकाळची शाळा म्हणजे एक संकट असायचं. भल्या सकाळी साखरझोपेतून जागे होऊन, तसल्या थंडीत आंघोळ करून, शाळेत जायला जिवावर यायचं. मग जाताजाता कुठे एखादी शेकोटी पेटवली असेल तर दोन मिनिटं तिथे हातपाय शेकून पुढं जायचं. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची कामं चालू असत. ते कामगार डांबर गोठू नये म्हणून त्या पातळ डांबराच्या बॉयलरखाली रात्रभर निखारा पेटता ठेवत. मग आम्ही त्या बॉयलरपाशीसुद्धा एखादा हॉल्ट अवश्य घेत असू. त्या लाकडांच्या निखाऱ्याचा आणि त्या डांबराचा एकत्रित वास असा काही  नाकात बसलाय की कधीही तो वास आला की मला थंडीतल्या शनिवारची शाळा आठवते.

असे अनेक वास, अत्तराचे, धुपाचे, वाटणाचे, तळणाचे, कुटण्याचे, दळण्याचे, सालींचे, गवताचे, मातीचे, झाडांच्या पाल्याचे, शेणाचे, कोळशाचे, चुलीचे, इस्त्रीचे, बसच्या धुराचे,  आणि कसलेकसले वास, कुठल्या ना कुठल्या आठवणी जाग्या करतातच.

मात्र या सगळ्यात प्राजक्ताच्या फुलांचा वास व त्याला जोडून येणारी एका छोट्या मुलीची आठवण 'जरा हटकें' आहे. लहानपणी गावात, श्रावणातल्या एका पावसाळी सकाळी, माझ्या आजीने, पलीकडच्या बर्वे वाड्यातून प्राजक्ताची फुलं आणायला पाठवलं. बर्वेआजी तशा अतिशय खाष्ट होत्या. एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या राहायच्या. पोराटोरांना त्यांच्या बागेत प्रवेश नसे. पण माझ्या आजीची मैत्रीण असल्यामुळे मी कधीही त्यांच्या बागेत घुसू शकत असे. तर बागेत पोचून मी झाडाखाली किती फुलं पडलीत त्याचा अंदाज घेतला व वेचायला सुरुवात केली. हलकासा पाऊस पडून गेला होता. प्राजक्ताच्या त्या फुलांचा मस्त वास सुटला होता. तेव्हढ्यात कुणीतरी झाड हलवलं. पाण्याचे थेंब अचानक अंगावर पडले. मी शहारून वर पाहीले. एका माझ्याच वयाच्या मुलीने झाड हलवलं होतं. घारी, गोरी, 'बर्वे' आडनावाला शोभणारी, बर्वेआजींची कोणी नात होती ती.

'भरपूर फुलं घे की. चल, मी मदत करते...... '

भराभरा तिनं फुलं वेचली. तोंडानी नॉनस्टॉप बोलत होती. माझ्या हातातली दुरडी भरल्यावरच ती थांबली. मी घरी परत आलो.

आजतागायत ती मला परत दिसली नाहीये. पण कधीही, कुठेही, प्राजक्ताच्या फुलांचा वास मला, तो श्रावण, ते अचानक अंगावर पडलेले पाण्याचे थेंब व त्या छोट्या मुलीची आठवण देऊन जातोच.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...