गेले दोन दिवस, युवराजांनी महाराजांना दिलेली झप्पी व त्यानंतर केलेली जादुई नेत्रपल्लवी याची सर्वच माध्यमातून चर्चा होत आहे. काही प्रमाणात चेष्टा, टवाळी होतेय तर काही जण ही कृती कशी 'डिप्लोमॅटिक' आहे हे पटवून देत आहेत. काही जण इंग्लिश मराठी शब्द एकत्र जोडून युवराजांवर वार करत आहेत, तर काही जण व्यंगचित्रांद्वारे महाराजांवर शरसंधान करत आहेत. असो. आजच्या ह्या ब्लॉगचा विषय हा नाहीये. त्यानिमित्ताने विचार करत असता विविध कारणांकरता होणारा डोळ्यांचा वापर लक्षात येऊ लागला. इथे मुद्दा, डोळयांमधून सहजपणे व्यक्त होणारे भाव हा नसून डोळ्यांचा मुद्दाम होणारा वापर, असा आहे.
लहानपणची पहिली आठवण आहे ती प्राथमिक शाळेतल्या बाईंची. मुलं दंगा करू लागल्यावर त्यावर मोठा आवाज काढून त्या वर्गाला गप्प करत. मात्र त्यांच्या आवाजापेक्षा आम्हाला धाक होता तो त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांचा. नंतर अनेकांना डोळे वटारताना मी पाहीले आहे. मात्र आमच्या त्या बाईंच्या डोळे वटारण्याची सर कुणालाही नाही.
मे महिन्याच्या सुट्टीत डोळ्यांचा जेव्हढा वापर झाला तेव्हढा परत कधीही झाला नसेल. लॅडीस खेळताना आपल्या पार्टनर कडे कोणती पाने आहेत किंवा उतारी काय करायची यासंबंधीच्या खाणाखुणा केवळ डोळ्यांनीच चालत. कधीकधी एखादा इशारा कळत नसे व त्यामुळे चुकीची उतारी होई. अथवा विरोधी पक्षाला त्या खुणा नीटच कळत. त्यावरून मग भांडणं होत. मग यावर उपाय म्हणून खेळ सुरु होण्याआधीच इशारे ठरवून घेतले जात.
एखाद्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याला 'डोळ्यात तेल घालणे' का म्हणतात ह्याचा मात्र मला कधीच उलगडा झालेला नाहीये. डोळ्यात काजळ अथवा सुरमा घातलेला पाहिलाय. पण डोळ्यात तेल घालून आलेला कोणीही इसम मी अद्याप पाहिलेला नाही. असाच एक न कळलेला दुसरा शब्दप्रयोग म्हणजे 'डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता'. आता डोळ्यात बोट घातल्यावर अंधारात दिसू लागतं हे कसं खरं मानायचं? अहो, इथे दिवसाढवळ्या चुकून डोळ्यात बोट गेलं तर पाच मिनिटं डोळ्यासमोर अंधारी येते.
त्यामानाने 'डोळा मारणे' या वापराशी संबंध जरा उशिराच आला. मुळात या पद्धतीचा संबंध हा चावटपणाशी जास्त आहे. 'केला इशारा जाता जाता' किंवा 'आंधळा मारतो डोळा' अशा शब्दप्रयोगातून डोळ्याचा मारण्यासाठी होणार वापर अधोरेखित होतो. त्यामुळे डोळा मारणारा किंवा मारणारी जरा 'तसलाच' किंवा 'तसलीच' आहे असे मानले जाते. एखाद्या गोष्टीचा सिरियसनेस घालवण्याकरता साधारणपणे डोळा मारला जातो. अचानक डोळा मिटला गेल्यामुळे अर्थाचा अनर्थ कसा होतो हे सांगणारी एक कविता, अभिनेते कै. यशवंत दत्त अतिशय बहारदारपणे सादर करत असत.
तर हे झाले डोळ्याच्या वापरासंबंधी थोडेसे. मात्र युवराजांच्या नेत्रपल्लवीतून काय अर्थ निघतोय व त्यामुळे पुढील काळात काय अनर्थ होतोय याकडे आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार हे मात्र निश्चित.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा