कळायला लागल्यापासूनचं आठवत गेलो, तर सुरूवातीची एक पाच-सात वर्षं सोडल्यास गेली सुमारे पंचेचाळीस वर्षं मी चहा पितोय. सुरूवातीची वर्षं मात्र अति तापदायक होती. खरं म्हणजे चहा हवा असायचा, पण एक तर 'चहा मिळणार नाही, रात्री झोपायचा नाहीस' हे तरी ऐकायला लागायचं किंवा 'चहा पिऊ नको हो, काळा होशील' हे तरी. ह्या दोन्ही सबबी खरं तर अत्यंत टुकार आणि खोट्या आहेत. पण सांगणार कुणाला? डोक्याला डोकं आपटलं की शिंगं उगवतात, पेरूची बी गिळली की पोटातून झाड येतं, बेडकीला दगड मारला की मुकी बायको मिळते.... काय अन काय. ते वयच ह्या आणि असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवण्याचं होतं. चहासंबंधी सबबी त्यातल्याच.
हळूहळू कुणा काकामामाच्या मेहेरबानीने अर्धी बशी चहा मिळू लागला. मग काही दिवसांनी आजोळी गेल्यानंतर आजी 'चाय कम, दूध ज्यादा' देऊ लागली. त्या पेयाला चहा म्हणणं चुकीचं होतं. पण निदान थोडा का होईना, चहा मिळतोय याचा आम्हाला आनंद, तर त्यानिमित्तानं पोरं दूध प्यायल्याचा आजीला आनंद. शेतावर जायला मात्र मी ज्याम खूष असायचो. इतर अनेक कारणं होती, पण शेतात गेल्यानंतर तिथली माणसं आमच्यासाठी चहा करायची. साखरेऐवजी गूळ घातलेला, नावालाच दूध असलेला, इंजिन ऑइलच्या रंगाचा, पण चवीला खमंग लागणारा तो चहा प्यायला बरं वाटायचं.
दिवस सरत गेले व हळूहळू, रंकापासून रावांपर्यंत कुणालाही आवडणाऱ्या, झोपडीपासून महालापर्यंत कुठेही विचारल्या जाणाऱ्या व टपरीपासून फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत कुठेही मिळणाऱ्या, ह्या चहाच्या मी प्रेमात पडलो. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही कारणांनी अथवा कारणाशिवाय पिता येणारं हे एक अद्भुत पेय आहे. बहात्तर रोगांवर 'अक्सीर इलाज' असणारी औषधं असतात ना, तसा बहात्तर निमित्तांना 'अक्सीर आधार' म्हणजे चहा. म्हणजे बघा ना;
- खूप काम झालंय? - चला, चहा पिऊ
- काही काम नाहीये? - चला, चहा पिऊ
- बसून बसून कंटाळा आलाय? - चला, चहा पिऊ
- फिरून फिरून दमलोय!! - चला, चहा पिऊ
- ज्याम उकडतंय!! - चला, चहा पिऊ
- फारच थंडी आहे बुवा !!- चला, चहा पिऊ
- एकटेच आहात? - थोडा चहा तरी प्या
- मित्र भेटलेत? - चहा पाहीजेच
एक ना दोन, कितीतरी कारणं नी सबबी. पण एक आहे मात्र, कुठलंही कारण असो, अशावेळी चहाच पाहीजे.
मागे एकदा भोरच्या बाजूला जाण्याचा योग आला. त्या भागात नीरा मोठ्या प्रमाणात तयार होते. पु.लं. नी 'वंगचित्रे' मधे 'खेजूर रस' या नावाने त्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे (किंवा केल्यामुळेच) पहाटे पहाटे ही ताजी नीरा प्यायलो आणि पुलंचे म्हणणे पटले. 'सकाळच्या पारी प्यायचे पेय एकच, चहा.'
तसं पाहिलं तर मोठ्या पंचतारांकीत हॉटेलात जरी चहा मिळत असला तरी त्यात फारसा काही राम नसतो. नाजूक डिझाईनच्या त्या कपबश्या, ती किटली, दुधासाठी वेगळी छोटी किटली, ते साखरेचे क्यूब्स असा सगळा बडा सरंजाम असतो खरा, पण त्यानंतर बनलेल्या चहात 'ती' मजा नसते. असाच एक दुसरा न पटणारा चहा म्हणजे 'डिप डिप' वाला. काही अर्थ नाही त्या चहाला. चहाची खरी मजा येते ती जनता पातळीवर. माझ्यापुरतं सांगायचं तर अनेक ज्ञात, अज्ञात ठिकाणच्या जनता चहाची मी मजा लुटलीय.
सगळ्यात प्रथम क्रमांकावर (हे माझे मत आहे. उगाच त्यावरून 'वाचकांची पत्रे' नकोत) येणारा चहा म्हणजे पुण्यामधे मिळणारा 'अमृततुल्य' चहा. इतर गावातली मंडळी उगाच त्याला, 'त्यात काय आलंय अमृततुल्य' असे म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात असूयेचा भाग जास्त असतो. ह्या दुकानाला, कुठल्याही शब्दाला 'श्वर' किंवा 'नाथ' जोडून नाव दिलेले असते. दाराशीच तो मालक, सिंहासनावर बसून चहा बनवत असतो. एका मोठ्ठया स्टोव्हवर पातेल्यात ते मिश्रण उकळत असतं. त्याचा असिस्टंट कोणाला किती चहा हवेत ते विचारून कप मांडत असतो. मधेच तो मालक पितळेच्या छोट्याशा खलबत्त्यात कुटून वेलची टाकतो. मधेच त्या सिंहासनाखालचा कप्पा उघडून पैशाची देवघेव करतो. अखेर चहा तयार होतो. मग फडक्यातून तो चहा गाळला जातो. हे सर्व अमृततुल्यवाले कधीही गाळणं वापरत नाहीत. फडकंच वापरतात. मात्र आजतागायत कधीही मी स्वच्छ फडकं वापरताना पाहीलं नाहीये. एव्हढंच काय, तर कधीही, कुठल्याही अमृततुल्यवाल्याला नवीन फडकं वापरायला काढताना पाहिलेलं नाहीये. आणतानाच तसली कळकट फडकी आणतात की काय देव जाणे. कदाचित त्या तसल्या फडक्यामुळेच चहाला ती अद्वितीय चव मिळत असावी.
पुण्यातल्या ह्या अमृततुल्यवाल्यांकडे मिळणारा आणखी एक विशेष पेयप्रकार म्हणजे 'मारामारी'. ह्यात चहा व कॉफी दोन्ही घातलेली असते. हा प्रकार जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाही. तसा चवीला बरा असतो, पण अगदी खरं सांगायचं तर चहाची मजा नाही.
कॉलेजमधे गेल्यावर व त्यानंतरही मी पुण्यातल्या अनेक अमृततुल्य चहाचा आस्वाद घेतलाय. पण माझी व्यक्तिगत आवडती ठिकाणं म्हणजे साहित्य परिषदेसमोरचं नागनाथ, शनिपारासमोरचं बाणेश्वर, नारायण पेठेतलं अमृतेश्वर, शिवाजी रोडवरचं नागेश्वर, शनिवार पेठेतलं प्रभात व लक्ष्मी रोडवरचं अंबादास. हे अंबादास त्याकाळी जवळजवळ चोवीस तास उघडं असायचं. रात्री अभ्यास करताना बऱ्याच वेळा मध्यरात्री आम्ही मित्र तिथे जमून चहा पिता पिता अभ्यासाबद्दल बोलत असू. आता '११ वाजता बंद' च्या भानगडीत ती मजा गेली.
ह्या व्यतिरिक्त मी अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या चहाचा आस्वाद घेतलाय. त्यातील काही ठळक ठिकाणांची यादीच करायची तर;
- शेगावचा 'पीवर' चहा
- मुंबईला व्यापारी भागात मिळणारा 'उकाळा'
- कोल्हापूरचा फक्त दुधाचा दाट चहा
- उत्तर भारतात मिळणारा 'कुल्लड' मधला चहा
- दक्षिण भारतातला स्टीलच्या ग्लासातला थोडासा कॉफीच्या अंगाने जाणारा चहा
- मावळातल्या एखाद्या गडाच्या पायथ्याच्या गावातला चुलीच्या वासाचा चहा
- कुठल्याही सर्वसाधारण टपरीवरचा रॉकेलच्या वासाचा चहा
- पंजाबमधल्या एखाद्या ढाब्यावरचा तंदूर चहा
- मुंबईच्या इराण्यांकडचा चहा
- गुजराथी लोकांचा आवडता 'मसालानी चाय'
- पठाणकोटला प्यालेला, साखरेऐवजी मीठ घातलेला काश्मिरी चहा
- श्रीलंकेत चहाच्या कारखान्यात मिळालेला शब्दशः ताजा चहा
- सौदी अरेबियामधे मिळालेला, जणू उंटाचं दूध घातलंय, असं वाटणारा चहा
- कुठल्याही रेल्वे स्टेशनवर मिळणारा, कसलीही चव नसलेला चहा
- रेल्वे स्टेशनवरच्या चहापेक्षाही भीषण चवीचा, हल्ली कुठल्याही ऑफिसमधे मिळणारा मशीनचा चहा
सहज लिहिता लिहिता आठवलं तेव्हढं लिहिलं. या व्यतिरिक्त ग्रीन टी, लेमन टी, चीनमधे मिळणारा, जाईच्या पाकळ्या घातलेला, असे अनेक फ्लेवर्ड प्रकारही मी प्यालोय. मौलाना आझादना पण हा जाईच्या पाकळ्या घातलेला चिनी चहा अतिशय आवडत असे. हा चिनी चहा हाच खरा चहा व आपण जो चहा पितो तो इंग्रजांनी आणला व तो खऱ्या चहाचा घोर अपमान आहे, असे ते मानत. आणि म्हणूनच नगरच्या तुरुंगात गेल्यानंतर, त्यांना चहा मिळाला नाही तेंव्हा, 'अब चाय खत्म हुई' असा एक सुंदर लेख लिहून गेले.
मला स्वतःला मनापासून आवडतो तो हाच इंग्रजांनी वारशात दिलेला, आलं किंवा गवती चहा घातलेला, दूध थोडं कमी व किंचित जास्त साखर असा चहा.
चहा कसा प्यावा याचेही काही संकेत आहेत. टपरीवरचा चहा हा काचेच्या ग्लासातनंच प्यायचा असतो. अमृततुल्यचा चहा मात्र लठ्ठ पांढऱ्या कपातूनच मिळतो. हल्ली तिथे बशी देत नाहीत. पूर्वी दोन मित्र चहा प्यायला गेले तर एकच चहा मागवत आणि वन बाय टू पीत. एक जण बशीतनं प्यायचा, दुसरा कपातनं. बशीची कपात झाल्यामुळे, हा प्रकार थांबला. मोठ्या हॉटेलात गेलात तर तिथल्या नाजूक कपाइतक्याच नाजूकपणे हळूहळू सिप करायचा. उत्तरेत गेलात तर मातीच्या कुल्लडमधे व दक्षिणेत गेलात तर बाहेरून मोठा दिसणाऱ्या पण आतून छोटा असणाऱ्या स्टीलच्या फसव्या ग्लासातून. घरी असलात तर मात्र मोठा मग भरून, गॅलरीत निवांत बसून प्यायला पाहिजे. कधीतरी बशीत ओतून, फुंकर मारत प्यायला पण मजा येते.
चहा फक्त स्वतंत्रपणेच प्यायला पाहीजे अशी काही अट नाहीये. चहाचे काही चविष्ट साथीदार पण आहेत. त्या साथीदारांसोबत चहाची चव कित्येक पटीत वाढते. मात्र परिस्थिती आणि जागा यावरून चहाचे साथीदार ठरतात. कुठल्याही अमृततुल्यमधे गेलात, तर बरणीतली नानकटाई किंवा क्रीमरोल अवश्य खायला हवा. पण इराण्याच्या हॉटेलात गेलात तर चहाबरोबर बनमस्का किंवा ब्रूनमस्काच पाहीजे. एखादे वेळी चेंज म्हणून खारी सुद्धा चालते. रविवारी सकाळी चहाबरोबर पॅटीस हा कित्येक पुणेकरांचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता आहे. (ह्या सवयीलासुद्धा अ-पुणेकर नाकं मुरडतात). पण एक आहे, रविवारी सकाळी चहा-पॅटिसची जी चव लागते ना, ती इतर दिवशी लागत नाही. त्यातही पुन्हा हे सर्व साथीदार, चहात बुडवून खाल्ले की आणखीन चविष्ट लागतात. पहिल्या वळीवाचा पाऊस बरसल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर मात्र चहाबरोबर फक्त खेकडा भजीच पाहिजेत. एखादे दिवशी सकाळी ऑफिसला निघायची गडबड असेल तर गरमागरम पोळीला थोडं तूप व मीठ लावून, रोल करून, चहाबरोबर खाऊन बघा. छान लागतं.
तर असा आहे हा माझा सखा, चहा. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेळी आवडणारा, हवासा वाटणारा. जे लोकं 'शी: मला नाही चहा आवडत, असं म्हणतात ना, ते अगदी डोक्यात जातात. 'आम्ही बुवा फक्त कॉफी पितो' असं म्हणणारे त्यातलेच. चहा हा चहाच हो. त्यामुळेच ह्या चहाशत्रू लोकांना दाघ देहलवींच्या शब्दात म्हणावसं वाटतं की 'हाय कंबख्त, तू ने पी ही नहीं....'

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा