मुख्य सामग्रीवर वगळा

दोन झेन कथा

गेल्या दोन - चार दिवसात काही कारणांनी झेन बुद्धपंथातल्या दोन गोष्टी वाचनात आल्या. या पंथातल्या गोष्टी तशा छोट्याशाच असतात, पण खूप काही शिकवणाऱ्या असतात.  मला आवडलेल्या दोन गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुम्ही कदाचित आधीच वाचल्या असतील.

१. 
प्रचंड थंडी पडली होती. एक भिक्षू झोपडीच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. समोरून एक वाटसरू चालत चालला होता. शेकोटी पेटलीय पाहून थोडा वेळ शेकायच्या इराद्याने तिथे येऊन बसला. काही वेळाने त्याने पाहिले की शेकोटीत लाकूड म्हणून जे घातले होते, ती एक बुद्धाची मूर्ती होती. वाटसरू भडकलाच. तो त्या भिक्षूवर ओरडला,

"अरे पाप्या, हे काय करतोयस?"

"लाकडातून बुद्धाला मुक्त करतोय." भिक्षू शांतपणे म्हणाला.

"अरे मूर्खा, बुद्ध काय असा लाकडात असतो का?"

"नाही ना? मग ते लाकूड जाळण्यात पाप कसलं?"

२.
एक माणूस आपल्या मुलाला शिकण्यासाठी बुद्ध मठात पाठवायचं ठरवतो व त्याला घेऊन मठात येतो. हा मठ व त्यातील गुरु खूप नावाजलेले होते. मठात आल्यावर बघतो तर काय? सगळे शिष्य आपापली कामं किंवा अभ्यास करत होते. गुरुंचेही काही स्वतःचे वाचन चालू होते. त्या माणसाची अपेक्षा होती की वर्ग चालू असतील, गुरु काही शिकवत असतील. इथे काहीतरी वेगळेच दिसत होते. शिष्यांनी जर सगळं स्वतःहूनच करायचं असेल तर ह्या गुरुचं इथे काय काम? असा त्याला प्रश्न पडला. नाराज होऊन तो परत जायला निघाला. गुरूंच्या ते लक्षात आले. त्यांनी त्या माणसाला थांबवलं व बाहेर बागेत घेऊन आले.

त्यांनी एका तरुण, उत्साही शिष्याला बोलावलं व समोरच्या उंच, सरळसोट झाडावर न थांबता चढून, उतरायला सांगितलं. कुणा पाहुण्यांसमोर गुरूंनी काही करायला सांगितलंय म्हणल्यावर तो शिष्य चपळाईने सरासरा चढून गेला व तितक्याच चपळाईने उतरू लागला. त्या माणसाचा जीव वरखाली होत होता. पण गुरु मात्र शांत होते. शिष्य शेवटच्या फांदीपर्यंत पोचला आणि आता खाली उडी मारणार, तितक्यात गुरु म्हणाले, थांब, जरा खाली बघ आणि मग उडी मार. शिष्याने थांबून पाहीले तर एक काटेरी फांदी पडली होती. फांदी दिसल्यावर त्याने जपून थोडी पलीकडे उडी मारली. गुरूंनी त्याची पाठ थोपटली व त्याला जायला सांगितले.

त्या माणसाकडे वळून त्यांनी विचारलं, आमचं काम काय आहे ते लक्षात आलं ना...?


मला वाटतं ह्या दोन गोष्टींवर बाकी काहीही भाष्य करायची आवश्यकता नाहीये.



© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...