मुख्य सामग्रीवर वगळा

श्रेय का हो देईना....

 सध्याच्या काळात व्हॉट्स ऍप्प हा आपल्या दिवसाचा एक अविभाज्य घटक बनला आहे, यात वाद नाही. हे असं असणं चांगलं का वाईट हा माझा मुद्दा नाहीये. मला आज एक वेगळाच विचार मांडायचा आहे. दिवसभरात आपल्याला अनेक सुंदर, सुंदर कविता, लेख, फोटो, चित्र येत असतात. काही वेळा त्या कवीचे, लेखकाचे वा चित्रकाराचे नाव खाली लिहीलेले असते, पण बहुधा नसते. बहुतांशी हे सर्व मेसेज आपल्या परिचितांनी फॉरवर्ड केलेले असतात. आपल्या ह्या परिचितांनासुद्धा ते कुणीतरी फॉर्वर्डच केलेले असतात. बरं हल्ली व्हॉट्स ऍप्पवाल्यांनी सुधारणा केल्यामुळे असला मेसेज हा फॉरवर्ड केलेला आहे, हे ही लगेच कळू शकते. पण कुठेतरी, कुणीतरी एक पहिला असणारच. अनेकवेळा जेंव्हा अशा मेसेजेसच्या खाली मूळ निर्मात्याचे नाव नसते, त्यावेळी ह्या पहिल्यांदा फॉरवर्ड करणाऱ्याला शोधून, खडसावून विचारावेसे वाटते की मूळ निर्मात्याला श्रेय न देण्यामागचा तुझा हेतू तरी काय? कारण जो पहिल्यांदा फॉरवर्ड करत असेल, त्याचा मेसेज 'फॉर्वर्डेड' नसणार. तो जणू काही त्याचा स्वतःचाच असणार.

माझा रत्नागिरीला राहणारा एक मित्र असेच काही छान छान लिहीतो व फेसबुक अथवा व्हॉट्स ऍप्पवर, स्वतःच्या नावाने, प्रसिद्ध करतो. किमान ९०% वेळा त्याचे स्वतःचेच लेख त्याला फॉरवर्ड म्हणून येतात, अर्थातच त्याचे नाव गाळून.

एखाद्या व्यक्तीला, तिने निर्मिलेल्या एखाद्या कलाकृतीचे श्रेय द्यायला इतकी जीभ जड होते? का नाव टाईप करताना हाताला कंप सुटतो? सरळ नाव गाळून टाकता? असं तर नाही ना की ती कलाकृती स्वतःच्या नावावर खपवायची आहे? तसे असेल तर खुशाल स्वतःचे नाव टाकायची हिम्मत तरी दाखवा ना. पण तेव्हढेही धारिष्ट्य नसते, कारण जगाला फसवलं तरी मनाला कसं फसवणार?

आपल्यापैकी अनेकांकडे खूप काही दडलेले टॅलेंट असते. काही ना काही कारणाने त्यांना हे टॅलेंट जगापुढे आणणे शक्य झालेले नसते. आज ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे असे अनेक दडलेले टॅलेंट आपल्यापुढे येत आहे. जरा दोन कौतुकाचे शब्द बोलून, त्या व्यक्तीच्या नावासकट पुढे फॉरवर्ड केलेत तर काय 'नरकात जाऊ' असं वाटतंय का?

काल परवा माझ्या वेगवेगळ्या ग्रूपवरच्या मित्रांनी दोन वेगवेगळ्या कविता फॉरवर्ड केल्या आहेत. मला खूप आवडल्या. अर्थातच खाली कवीचे नाव नाहीये. माझ्या मित्रांनाही ते नाव माहीत नाहीये. इथे खाली मी त्या कविता मुद्दाम देतोय. ह्या दोन्ही कविता माझ्या नाहीत. एक कणभरसुद्धा त्याचे श्रेय मला नकोय. कृपया कुणाला मूळ कवीचे नाव माहीत असेल तर मला कळवायची तसदी घ्या. आणि ह्यापुढे जेंव्हा कधी एखादी चांगली कलाकृती फॉरवर्ड कराल तेंव्हा मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय द्यायला विसरू नका, ही कळकळीची विनंती.... 

पहिली कविता:

आज का असे वाटते जातीचा रंग सच्चा आहे
आयुष्यातल्या मैत्रीचा धागा मात्र कच्चा आहे

मुंजीला जेवलो तो बर्व्या आज ब्राम्हण आहे
भंडारा लावून जेजुरी चढलो तो सुर्व्या मराठा आहे
कांबळ्याने सोललेला ऊस खाल्ला तो दलित आहे
खरंच का हेच आमच्या मैत्रीचे फलित आहे

लहानपणी खेळताना कधीच नव्हते कळले
कोणालाही लागले तरीही थुंकी लावून चोळले
चिखल असो वा माती नखशिखांत अंगभर लोळले
मैत्रीचे सारे नियम बिनदिक्कतपणे पाळले

बर्व्याचे बाबा गंभीर असताना रक्तदान केले
सुर्व्याने दिलेल्या रक्ताने बर्व्याचे बाबा वाचले
कांबळ्याने आणलेल्या औषधाचे पैसे कुणी दिले
त्यावेळी हे हिशोब कुणीच नाही मागितले

बाबा वाचले म्हणून बर्व्याने देवाला पेढे ठेवले
पण पहिले दोन पेढे मैत्रीच्या देवांना दिले
अश्रु भरल्या डोळ्यांनी छातीशी कवटाळले
एका बापामुळे तिघे पोरके होताना वाचले

सुर्व्याच्या बाबांचे कलेवर सीमेवरून आले
शत्रूच्या गोळ्यांनी शरीर पिंजून सारे गेले
जातीचे प्रमाणपत्र गोळ्यांनी नाही पाहिले
खांद्यावर घेताना तिघे हमसाहमशी रडले

अशा ह्या मैत्रीला ग्रहण कशामुळे लागले 
खट्याळपणा कुणाचा अन् सारे रान पेटले
इतिहासातल्या घटनांवरून राजकारण तापले
जिवाभावाच्या मित्रांचे चेहरे कावरेबावरे झाले....

दुसरी कविता:

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"🙁

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"☹

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मी "अहिल्या देवींवर" कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का?"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....🤔

वाट पाहतोय.......🙄
"ती" माणसे गेली कुठे...

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त जात जिवंत ठेवली आहे..... 

ह्या कवितांच्या अर्थावर चर्चा तर होईलच, व्हायलाही हवी, पण त्यासोबत आजच्या ह्या ब्लॉगच्या मूळ उद्देशावर मत व्यक्त झाल्यास, ब्लॉगचा हेतू थोडाफार सफल होईल. 


© chamanchidi.blogspot.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून