मुख्य सामग्रीवर वगळा

व्रतवैकल्ये : एक विपर्यास

गेले काही दिवस जाता येता विविध हॉटेल्स (विशेषतः मांसाहारी) व धाब्यांच्या 'आखाड पार्टी' संबंधी मोठमोठ्या जाहिराती नजरेस पडत होत्या. कारण स्वच्छ होतं. पुढील काही दिवसात श्रावण महिना सुरु होणार होता. श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे आत्ताच काय तो कोटा भरून घ्या, नंतर महिनाभर काहीही मिळणार नाहीये, या भावनेने मांसाहारप्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने ह्या आखाड पार्ट्यांचा आनंद लुटला. शाकाहारी मंडळी अर्थातच सर्व कोनांमधून नाकं मुरडून घेतली. त्यावर सोशल मीडियावर अनेक विनोद, चुटकुले व व्यंगचित्रे पसरली. आषाढाच्या शेवटच्या दिवसाला 'दिव्याची अमावस्या' म्हणावे का 'गटारी' म्हणावे यावर अनेक भावनाभरीत वादंग झडले. ज्यानं त्यानं आपल्याला हवं तेच केलं व अखेर श्रावण सुरु झाला.

ह्या सगळ्या भानगडीत होतंय काय की ह्या व्रतवैकल्यांमागे जी काही शास्त्रीय कारणे आहेत त्याचा शोधच घेतला जात नाही. कारण ही व्रतवैकल्ये पाळणारी जी कर्मठ मंडळी आहेत ती केवळ 'बाबा वाक्यम प्रमाणं' या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत तर बुद्धीप्रामाण्यवादी त्याचा शोध घेण्याऐवजी केवळ विरोध म्हणून न पाळण्याचा हटवादीपणा करत आहेत.

'देव दानवा नरे निर्मिले' हे संतवचन योग्य मानायचे, तर एक विचार असा मनात येतो की मग आपल्या पूर्वजांनी ही व्रतवैकल्ये का तयार केली असतील? ह्यासाठी मी काही अशा व्रतांचा शास्त्रीय संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला. मी काही शास्त्र शाखेचा विद्यार्थी नाही. त्यामुळे माझी ही मते बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. पण त्यानिमित्ताने त्यामागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास होऊन ती लोकांपुढे यावीत एव्हढाच एक हेतू आहे.

लहानपणी आमच्या बालमैत्रिणी श्रावणात दर सोमवारी पत्री गोळा करत. ही पत्री म्हणे कुमारिकांनीच गोळा करायची. हे आपल्या गावातल्या सगळ्या पोरी सकाळी सकाळी गावाबाहेर जाऊन, बकऱ्या चरल्यागत, दिसेल त्या झाडाझुडुपांची पानं ओरबाडून आणायच्या. पुजारी वा भिक्षुक मंडळी 'हल्ली पत्री पूर्वीसारखी मिळत नाही' म्हणत, हाताशी येतील ती पानं पूजेला वापरत व (यजमानाच्या तोंडाला पानं पुसून), दक्षिणेची सोय करून घेत. माझ्या मते याला खूप चांगली शास्त्रीय परंपरा असावी. पूर्वी गावात डॉक्टर्स नसत. लहानमोठ्या दुखण्यावर 'आजीबाईचा बटवा' हा एकच आधार असे. ह्या बटव्यात अनेक औषधी वनस्पती असत. ह्या सगळ्यांची लहानपणापासून नीट माहीती व्हावी म्हणून ह्या 'आजीबाई'ना, 'कुमारिका' असल्यापासून पत्री गोळा करायला गावाबाहेर पाठवत असावेत. श्रावणात अथवा नंतर गणपतीला वाहील्या जाणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचा औषधी उपयोग आहे. पुढल्या महिन्यात गणपती बसतील, तेंव्हा हवं तर तपासून बघा.

श्रावणात, म्हणजेच पावसाळ्यात, मांसाहार वर्ज्य असण्याचेही कारण आहे. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते. (हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे). त्यामुळे पचण्यासाठी थोडे कठीण असणारे पदार्थ वर्ज्य मानले आहेत. ह्या यादीत वांगं, कांदा वगैरे शाकाहारी सदस्य पण आहेत. पण याचा विचार न करता, धर्ममार्तंड तावातावाने फक्त मांसाहारावर वाद घालतात व बुद्धीमार्तंड मुद्दाम श्रावणात त्यावर ताव मारतात.

नुकतेच खंडग्रास ग्रहण होऊन गेले. ग्रहणात काही खाऊ नये, अन्न उरल्यास ते टाकून द्यावे, घराबाहेर पडू नये इ. अनेक कर्मकांडांचा मारा झाला. खरं कारण असं असणार की पूर्वीच्या काळी वीज किंवा बॅटरी वगैरे नव्हत्या. अचानक अंधार झाल्यामुळे प्राणी, कीटक बाहेर पडत. असे कीटक अन्नात पडण्याची शक्यता होती. म्हणून अन्न झाकून ठेवायचे व शक्यतो खायचे टाळायचे. बाहेर फिरताना साप किरडू किंवा विंचू काटा डसण्याची शक्यता होती, म्हणून घरात बसायचे. शाळेत असताना अशाच एका खग्रास ग्रहणाचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली होती. सूर्य पूर्ण झाकला गेल्यानंतर प्राणी, पक्षी व कीटक, किती विचित्र (weird) वागतात हे मी स्वतः अनुभवले आहे.

मला सदैव प्रश्न पडे की मग आपल्या पूर्वजांनी ही अशी व्रतवैकल्ये का काढली असतील. मध्यंतरी आलेला, परेश रावळ, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव व अक्षयकुमार यांचा अप्रतिम अभिनय असलेला चित्रपट 'ओ एम जी' पाहताना मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. एका प्रसंगात एक स्वामी (मिथुन चक्रवर्ती) नायकाला (परेश रावळ) म्हणतो की we are not God loving people, we are God fearing people. आपल्या पूर्वजांना हे नक्कीच माहित होते. प्रत्येक अशा नियमाचे कारण प्रत्येक व्यक्तीला समजवून सांगणे केवळ अशक्य आहे. विशेषतः त्या काळी जेंव्हा शिक्षण व संपर्क साधने यांचा अभाव असल्यामुळे, प्रत्येकाला समजावत बसण्यापेक्षा, अशा प्रत्येक नियमाची गाठ, एखाद्या व्रताशी घालून दिली असावी. अमुक एक करा, स्वर्ग मिळेल. तमुक एक करू नका, केल्यास नरकात जाल. अशा स्वरूपाच्या आदेशांद्वारे ह्या नियमाचे पालन होण्याची एक सिस्टिम निर्माण झाली असावी. पुढल्या हजारो वर्षांत हरदास व भिक्षुक मंडळींनी त्यानिमित्ताने आपापल्या मम्मं ची सोय करून घेतली.

ह्या सगळ्याचा शास्त्रीय कार्यकारणभाव लोकांसमोर येणे आवश्यक आहे. तरच कर्मठ गटाकडून होणारा 'मी सांगतो म्हणून' होणारा विपर्यास व त्याला काउंटर करण्यासाठी 'तू सांगतोस ना, आता उलटच वागतो' असा बुद्धीवादी गटाकडून होणार विपर्यास, याला आळा बसून, मनुष्याकरिता योग्य अशा काही जीवनशैलीप्रमाणे आपण सर्व, समजून उमजून, वागू शकू.

                                                                                                                                                                  © chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

  1. विचार पटणारे आहेत. बरेच बुद्धिप्रामाण्यवादी,उदा. मी गेल्या 4 वर्षा पासून मला पटले तरच खरे असे वागत आहे. त्यामुळे कारणमीमांसा माहीत न होता भीती पोटी काहीं करत नाही. मुद्दाम भावनांचा अनादर करण्याचे टाळतो. तेव्हा सर्व बुद्धिप्रामाण्यवादी हटवादी असतात असे नव्हे. आपल्या लेखात तसा उल्लेख नाही. लेख व्यवस्थित समतोल साधणारा आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस