मुख्य सामग्रीवर वगळा

दोघी...

ही पहिली...

उच्चशिक्षित. शाळेत असल्यापासूनच खूप हुषार. आता आयटी क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी. भलामोठा पगार.  नवराही अगदी शोभेलसा. शहराच्या उत्तम भागात सुरेखसे घर. दोघांच्याही आपापल्या चारचाकी, दुचाकी गाड्या. घरात काहीही कमी नाही.

आज बऱ्याच दिवसांनी छोट्याला घेऊन आईकडे आली होती. आईला एकाच वेळी आश्चर्यही वाटलं होतं, आनंदही झाला होता, पण तिचा चेहरा पाहून जरा शंकेची पालही चुकचुकली होती. चहापाणी झाल्यावर हळूच आईनं विषय काढला आणि तिचा बांध फुटला.

"........ लक्ष देत नाही...... रोज उशिरा येतो..... तोही खूप दारू पिऊन....विचारलं तर धड बोलत नाही....कधीमधी हात टाकतो.... बहुतेक बाहेर कुणी एक मैत्रीण असावी.....असं वाटतं की सरळ बॅग उचलावी व तुझ्याकडे निघून यावं....."

आईनं नीट ऐकून घेतलं व एकेक पत्ता टाकत समजवायला सुरुवात केली.

"......तुझ्या बाबांची इभ्रत........भावाचं स्थान......आम्ही केलेले संस्कार......लोक काय म्हणतील......छोट्याकडे बघून तरी विचार कर......तू सुद्धा काही कमी हट्टी नाहीयेस.....एकट्या बाईचं जगणं........."

जन्मदात्या आईच्या कुशीतसुद्धा जागा नाही हे तिच्या लक्षात आलं. छोट्याला हाताशी धरून ती परत फिरली.

आधीच हरलेली लढाई पुन्हा हरण्यासाठी......


ही दुसरी....

जेमतेम चौथी पास. वयात आल्या आल्या आईबापानं लग्न लावून दिलं होतं. दहा वर्षात तीन पोरं एव्हढंच काय ते नवऱ्यानं दिलं होतं. शहराच्या बकाल भागात एक चंद्रमौळी झोपडं. चार घरची कामं करून पोरांना मोठं करायची स्वप्न बघत होती.

आज बऱ्याच दिवसांनी पोरांना घेऊन आईकडे आली होती. आईला एकाच वेळी आश्चर्यही वाटलं होतं, आनंदही झाला होता, पण तिचा चेहरा पाहून जरा शंकेची पालही चुकचुकली होती. चहापाणी झाल्यावर हळूच आईनं विषय काढला आणि तिचा बांध फुटला.

"...... उशिरा येतो..... तोही खूप दारू पिऊन....विचारलं तर धड बोलत नाही....मारहाण तर रोजचीच.... पोरांनाही बडवतो.....  गावातल्या दुसऱ्या वस्तीत एकीला ठेवलंय म्हणे..... अति झालं तेव्हा आज पोरांना घेऊन निघून आलीय..... कायमची...... "

आईनं नीट ऐकून घेतलं व न बोलता हिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली.

हिनंच पुढं बोलायला सुरुवात केली.

"आई, तू काही काळजी करू नको. मी अजून चार घरची कामं करीन. बा आणि भावाला ओझं होणार नाही. जरा दोन पैसं मिळालं की हितच दुसरं झोपडं घीन. पोरांना मोठ्ठ करायचं एव्हढंच काम आता मला...... "

चहा पिऊन तिनं पोरांना आईपाशी सोडलं व नवीन कामं शोधायला बाहेर पडली.

एकदा हरलेली लढाई पुन्हा लढण्यासाठी......

© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत