ती एक अनामिक...
गेली सुमारे सात आठ वर्षं, माझ्या परतीच्या रस्त्यावर एका विशिष्ट सिग्नलला मी तिला बघतोय.
अगदी पहिल्यांदा पाहिली तेंव्हा चार पाच वर्षांचीच असेल. पाठच्या धाकट्याला हाताशी धरून सिग्नलला थांबलेल्या लोकांकडे पैसे मागत असे. रस्त्याच्या कडेला त्यांची आई आणखी एका तान्ह्याला घेऊन बसलेली असे. काही दिवसांनी दोघं भावंडं एका छोट्या लोखंडी कडीमधून उलट्यापालट्या कसरती करून दाखवू लागले. का कुणास ठाऊक, ती कायम माझ्याकडे प्यायला पाणी मागत असे. कधी कधी मी एखादा बिस्किटाचा पुडाही तिला देत असे. पाणी प्याल्यावर गोड हसून चक्क 'थँक यू हा काका' म्हणायची.
माझा घरापर्यंतचा उरलेला रस्ता तिच्या त्या हसण्याने सोपा होऊन जायचा.
गेली दोन चार वर्षं घरी परतायचा रस्ता बदलल्यामुळे ती दिसली नव्हती. परवा काही कारणाने त्या बाजूला जाणं झालं. मला पाहून पळत पळत आली. चांगलीच मोठी झाली होती.
"पाणी हवंय...?" मी विचारलं.
"नको काका. पुढल्या वेळी याल ना तेंव्हा तुमचा जुना शरट आनाल का?"
"हो आणीन हं. पण शर्ट कशासाठी गं...?"
"काका, ती गाड्यांवर जानारी पोरं जाता येता इकडं तिकडं हात लावायला बघत्यात. ढगलं शरट घातलं का तेव्हढंच जरा झाकायला बरं पडतं..." एव्हढं म्हणून पूर्वीसारखंच गोड हसून ती निघून गेली.
आज मात्र उरलेला रस्ता फार अवघड होऊन गेला होता....
© chamanchidi.blogspot.com
© chamanchidi.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा