बापू.....
नक्की कोण होता हे मला आजतागायत माहिती नाहीये. पण बहुधा शेतकरी असावा. माझ्या आजोळी, बहुतेक सगळे शेतकरीच होते. त्यामुळे बापूसुद्धा अर्थातच शेतकरी असणार, असा मी अंदाज बांधलाय. मातकट रंगाचं धोतर, तशाच रंगाचा शर्ट व गांधी टोपी, पायात जाड पायताण असा त्याचा वेष असे. मध्यम उंची, किरकोळ अंग, तोंडातले निम्मे दात गायब असा त्याचा अवतार होता. हसला की तोंडाचं अर्ध बोळकं व उरलेले, तंबाकू खाऊन पिवळे झालेले, दात नीट दिसायचे. सुमारे पन्नाशीचा हा काळासावळा माणूस माझ्या आजोबांकडे कशासाठी येत असे हे मला कधीच कळलं नाही. आला की आधी माझ्या आजीकडे जायचा व हक्कानं चहा प्यायचा. कधी तिची काही छोटीमोठी कामं करायचा. मग आजोबांकडे जाऊन, त्यांच्या चांदीच्या डबीतला तंबाकू खायचा. बहुतेक वेळा शेतीसंबंधी काहीबाही बोलत बसायचा. क्वचित काही न बोलता, ओटीवर बसून आकाशाकडे बघत बसायचा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेलो की हा हमखास भेटायचा. मी, माझी आई, माझा धाकटा भाऊ, असे सगळे जणू त्याचेच पाहुणे असल्यासारखा आनंदून जायचा. माझा भाऊ मला दादा म्हणतो म्हणून बापू पण मला दादा म्हणायचा. कधी आम्हाला नदीवर फिरायला न्यायचा. माशाची छोटी पिल्लं ओंजळीत पकडायचा आणि पुन्हा पाण्यात सोडून द्यायचा. कधी आंबे, तुती, बोरं, कणसं असा रानमेवा घेऊन यायचा.
एकदा मी एकटाच आजोळी गेलो होतो. खरं तर तिकडे मित्रांची अख्खी गॅंग होती. पण त्यादिवशी मी एकटाच घरी होतो. जाम कंटाळा आला होता. नेमका बापू उगवला. माझा कंटाळा घालवायला धनुष्यबाण करायचा त्यानं घाट घातला. परसातला एक बांबू घेऊन त्यानं एक सुरेख धनुष्य व पाच सहा बाण मला बनवून दिले. एका झाडावर विटकरीच्या तुकड्याने एक गोल काढला व म्हणाला, मारा आता बाणावर बाण. मी खूष. पण नंतर मात्र मला काही ते धनुष्य घेऊन बाण मारता येईनात. कधी नुसतीच दोरी टंकारायची व बाण हातातच राहायचा, तर कधी तिसरीकडेच जाऊन पडायचा. जाम चिडचिड झाली होती. तेव्हढ्यात बापू बाहेर आला.
"बापू, हे तुझं धनुष्य अगदी बेकार आहे..." नेम न लागल्याचा राग मी बापूवर काढला.
"बापूनं बनवलेलं हत्यार कधी बेकार जात नसतंय..." असं म्हणून त्यानं ते धनुष्य घेतलं व सपासप चार बाण त्या गोलात मारून दाखवले. मग धनुष्य माझ्या हातात देऊन, नीट बाण कसा मारायचा तेही शिकवलं. दोन चार बाण मारेपर्यंत खरोखरच माझाही नेम नीट लागायला लागला.
"हत्यार चांगलं का वाईट ते धरणाऱ्या हातावर ठरतं, दादा. हात चांगला तर हत्यार बी चांगलं. आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..." असं म्हणून तो निघून गेला.
आज बापू नाही. त्यानं बनवलेले ते धनुष्यबाण कधीच हरवले. मीच आता बापूच्या वयाला आलोय. पण आजही अडचणीच्या प्रसंगी बापूचे शब्द आठवतात. "आयुष्यात कदीबी हात पक्का ठेवा, हत्यार आपोआप कामाला लागंल..."
कोण कुठला बापू, पण आयुष्यभराचा नेम पक्का करून गेला.....
© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा