मुख्य सामग्रीवर वगळा

फ्रेंडशिप डे

कशासाठी असतो हो हा? मला आजतागायत कळलंच नाहीये की मित्र आणि मैत्री यासाठी एखादा विशिष्ट दिवस का पाहीजे.

शाळेत रोज पाच सात तास एकत्र घालवून नंतर पुन्हा संध्याकाळी दोन तास एकत्र खेळणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मधल्या सुट्टीत एकमेकांचा डबा आनंदाने शेअर करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

आठवडाभर एकत्र घालवून सुद्धा रविवारी एकमेकांशिवाय न करमणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मित्र बाहेरच्या जगात कोणी का असेना, भेटल्यानंतर त्याला मूळ नावाने हाक मारून, त्याला जमिनीवर आणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस? कितीही मोठे गॅझेटेड अधिकारी झालात तरी तुम्ही वामन्या आणि भद्र्याच, बोटीवर कॅप्टन असलास तरी तू लल्ल्याच, मोठ्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी असलास तरी तू विन्याच, कितीही मोठा आयएसओ ऑडिटर असलास तरी तू अवध्याच, सीए होऊन एखाद्या मोठ्या फर्मचा पार्टनर असलास तरी तू लिंब्याच, प्रसिद्ध डॉक्टर झालास तरी तू आमच्यासाठी डम्ब्याच.....

शाळा संपली, मार्ग बदलले, वर्षावर्षात गाठभेट पडत नाही, पण कधीही भेटलो तरी 'काय रे लिंब्या' म्हणणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

मैत्रिणीशी बोलत असताना, 'ए तुझा सासरा येतोय रे' असं म्हणून सावध करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

स्वतः कॉमर्सला असला तरी इंजिनीरिंग करणाऱ्या मित्राबरोबर सबमिशनच्या वेळी जागत बसणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

पाय मोडलेल्या मित्राच्या घरी जाऊन, एक्झाम फॉर्मवर त्याची सही घेऊन, वेळच्यावेळी सबमिट करणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

वर्षातले नऊ दहा महिने बोटीवर असणाऱ्या मित्राच्या आईवडिलांची, स्वतःच्या आईवडिलांसारखी काळजी घेणाऱ्यासाठी फक्त एक दिवस?

परदेशात राहणाऱ्या मित्राची भारतातील सगळी कामं पदरमोड करून पूर्ण करणाऱ्या मित्रासाठी फक्त एक दिवस?

मित्राच्या आजारी बायकोवर उपचार होण्यासाठी वणवण फिरणाऱ्या, त्यासाठी जमेल तेव्हढे काँट्रीब्युशन काढणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

एव्हढं करूनही ती गेल्यानंतर, वैकुंठावर, जगातल्या सगळ्या भाषांमधल्या सगळ्या भावना व्यक्त करणारी, एक थाप पाठीवर टाकणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

आज इतके मोठे झाल्यानंतरसुद्धा शाळेत असल्यासारखे वागणाऱ्या मित्रांसाठी फक्त एक दिवस?

अरे नाही रे नाही....

सगळं आयुष्य ज्या मित्रांवर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी फक्त एक दिवसच काय, अख्ख आयुष्य कुर्बान आहे.



© chamanchidi.blogspot.com 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत